Monday, July 6, 2026
Latest NewsPUNE

लेखक हे साहित्यशारदेचे मानकरीज्येष्ठ दुर्ग अभ्यासक प्र. के. घाणेकर

पुणे : लेखक हे साहित्यशारदेचे मानकरी आहेत. त्यांनी आपले ज्ञान पुस्तकांच्या माध्यमातून वाचकांसमोर आणले आहे. आपल्याला आवडलेल्या पुस्तकांच्या लेखकांशी संवाद साधावा. त्या संवादातून विचारांची देवाणघेवाण होऊन आपले ज्ञान वृद्धिंगत होईल, असे मत ज्येष्ठ दुर्ग अभ्यासक आणि लेखक प्र. के. घाणेकर यांनी व्यक्त केले.

प्रसाद प्रकाशन आणि अनाहत प्रकाशनच्या वतीने नवी पेठ येथील एस. एम. जोशी सभागृहात पुरस्कार प्रदान तसेच २४ पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांना कै. मनोहर य. जोशी स्मृती गौरव पुरस्कार, तर भारतीय विद्यातज्ज्ञ आशुतोष बापट यांना कै. मंजिरी मनोहर जोशी स्मृती गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर, प्रसाद प्रकाशनच्या संचालिका डॉ. उमा बोडस उपस्थित होत्या.

प्र. के. घाणेकर म्हणाले, देवावर माझी श्रद्धा आहे. माझ्यासाठी पूर्व दिशेला उगवणारा तेजस्वी सूर्य हा देव आहे. सूर्यामुळेच आपण जगतो. त्यामुळे सूर्यनारायणाला आपण देव मानतो, यामागे शास्त्रीय कारण आहे. माझा जन्म कोकणात झाला आहे. त्यामुळे समुद्र हा देखील माझ्यासाठी देवता आहे.

ते पुढे म्हणाले, हिमालयातील मुक्तिनाथ, लाहौल-स्पीती आणि काझा परिसरात आढळणारे शालिग्राम हे प्रत्यक्षात अमोनाइट प्रकारचे जीवाश्म आहेत. दगडात देव पाहायचा की देवामध्ये दगड, हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा आणि दृष्टीचा विषय आहे.

पांडुरंग बलकवडे म्हणाले, आजच्या २१ व्या शतकामध्ये विज्ञान प्रगत होत आहे. त्यामुळे जगात समृद्धी येत आहे. परंतु विज्ञानाला अध्यात्माची किंवा विचारांची जोड नसेल, तर जगात जे घडत आहे ते आपण पाहत आहोत. हजारो वर्षांपूर्वी आपली संस्कृती जगाच्या गुरुस्थानी होती. उद्याही जगाला दिशा देण्याचे काम आपल्या देशातील विचारवंतांना करावे लागेल. विश्वाचे कल्याण चिंतणारी आपली संस्कृती आहे.

आशुतोष बापट म्हणाले, भारतीय संस्कृती, इतिहास आणि वारसा यांच्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक होत आहे. भारताचा वारसा आणि स्थापत्यवैभव जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे, ही इच्छा असून या पुरस्कारामुळे आणखी प्रोत्साहन मिळाले आहे.

डॉ. उमा बोडस म्हणाल्या, प्रसाद प्रकाशनला ८० वर्षे पूर्ण होत आहेत. केवळ पुस्तके छापणे हेच प्रकाशन संस्थेचे काम नसून लेखकांचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्याची सामाजिक जबाबदारीही प्रकाशन संस्थेची असते. प्रत्येक पुस्तकामागे लेखकाची साधना असते. वाचनसंस्कृती जिवंत ठेवणे ही प्रसाद प्रकाशनची जबाबदारी असून भविष्यातही ही परंपरा अखंडपणे सुरू राहील.

सुवर्णा बोडस यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading