Monday, July 6, 2026
Latest NewsPUNE

पुणेरी मेट्रो’तर्फे अवघ्या तीन महिन्यांत नऊ स्थानके आणि डेपोवर रूफटॉप सौर प्रकल्पांची उभारणी

 

  • मेट्रो प्रकल्पाच्या एकूण वीज गरजेपैकी एक-तृतीयांश वीजेची निर्मिती सौरऊर्जेद्वारे होणार

पुणे : पर्यावरण पूरक आणि शाश्वत विकासाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत पुणेरी मेट्रो अर्थात पुणे मेट्रो लाइन ३ तर्फे या महत्वाकांक्षी प्रकल्पात हरित उर्जेचा समावेश करण्यात आला आहे. याच उपक्रमाचा भाग म्हणून, पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड (PITCMRL) ने अवघ्या तीन महिन्यांत नऊ स्थानके आणि मेट्रो डेपोवर सौरऊर्जा प्रकल्पांची उभारणी पूर्ण केली आहे. ही सर्व स्थानके मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत.
पुणेरी मेट्रो ही आपल्या एकूण वीज गरजेपैकी जवळपास एक-तृतीयांश वीज सौरऊर्जेतून निर्माण करणार आहे. मेट्रोच्या सर्व २३ स्थानकांवर आणि डेपोवर एकूण ७.६७ मेगावॅट पीक (MWp) क्षमतेची रूफटॉप सौरऊर्जा प्रणाली उभारण्यात येत असून, हा प्रकल्प राज्यातील सर्वात मोठ्या सौरऊर्जेवर आधारित शहरी सार्वजनिक वाहतूक उपक्रमांपैकी एक ठरणार आहे.
संपूर्ण सौरऊर्जा प्रणाली कार्यान्वित झाल्यानंतर दरवर्षी सुमारे १ कोटी युनिट (१४ दशलक्ष किलोवॅट-तास) स्वच्छ वीज निर्मिती होईल. यामुळे पारंपरिक वीजेवरील अवलंबित्व कमी होण्याबरोबरच मेट्रोच्या कार्बन उत्सर्जनातही लक्षणीय घट होणार आहे. स्थानकांची छते आणि डेपोवरील उपलब्ध जागेचा प्रभावी वापर करून ही सौरऊर्जा प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्यामुळे दीर्घकालीन दृष्टीने वीज खर्चातही मोठी बचत होणार आहे.
संपूर्ण प्रकल्प उभारणीनंतर पुणेरी मेट्रोच्या एकूण वीज गरजेपैकी सुमारे ३३ टक्के वीज सौरऊर्जेतून उपलब्ध होणार आहे. शाश्वत आणि पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्था उभारण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. तसेच, देशाच्या अक्षय ऊर्जा धोरणाशी सुसंगत राहून आधुनिक शहरी वाहतूक प्रकल्पांमध्ये स्वच्छ ऊर्जेचा प्रभावी वापर करण्याचे हे उत्तम उदाहरण ठरणार आहे.
हिंजवडी आयटी पार्क ते शिवाजीनगर या २३ किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गाची उभारणी शाश्वत विकासाचा विचार करून करण्यात आली आहे. ७५० व्होल्ट डीसी थर्ड रेल प्रणाली, कम्युनिकेशन-बेस्ड ट्रेन कंट्रोल (CBTC) सिग्नलिंग आणि ऊर्जा कार्यक्षम मेट्रो रेक्स यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानासोबत सौरऊर्जेचा वापर केल्याने हा प्रकल्प आधुनिक, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा नवा आदर्श ठरणार आहे.
दरम्यान, पुणे मेट्रो लाईन ३ ने संपूर्ण २३ किलोमीटरच्या उन्नत मार्गावर यशस्वी एंड-टू-एंड चाचणी पूर्ण केली असून, आता व्यावसायिक सेवेसाठी अंतिम तयारी सुरू आहे. आवश्यक वैधानिक मंजुरीनंतर मेट्रो टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्यात मान ते आर. के. लक्ष्मण संग्रहालय या १३.३ किलोमीटर लांबीच्या मार्गावर १२ स्थानकांसह सेवा सुरू होईल. त्यानंतर हा मार्ग डिस्ट्रिक्ट कोर्टपर्यंत विस्तारण्यात येईल, ज्यामुळे महामेट्रोच्या नेटवर्कशी थेट जोडणी उपलब्ध होईल. संपूर्ण मार्ग सुरू झाल्यानंतर शिवाजीनगर ते हिंजवडी हा प्रवास सध्याच्या सुमारे दीड तासांऐवजी अवघ्या ४५ मिनिटांत पूर्ण होईल. त्यामुळे प्रवासाचा वेळ ५० टक्क्यांहून अधिक कमी होऊन हजारो प्रवाशांचा रोजचा प्रवास अधिक जलद, सुलभ आणि पर्यावरणपूरक होणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading