Sunday, July 5, 2026
Latest NewsPUNE

उपाशी गरजूंची भूक भागविणाऱ्या ‘स्पर्श ममतेचा’ अन्नदान उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन

 

​पुणे : समाजातील उपाशी, वंचित आणि गरजू व्यक्तींची भूक भागविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘स्पर्श ममतेचा’ या अनोख्या अन्नदान उपक्रमात महिला वर्गाने सहभागी होण्याचे आवाहन ‘महालक्ष्मी इव्हेंट्स अँड केटरर्स’च्या संचालिका सोनू जोशी यांनी केले आहे. या उपक्रमांतर्गत दर शुक्रवारी आपल्या घरचे प्रेमाने बनवलेले ताजे जेवण खऱ्या अर्थाने गरजू आणि अन्नाची गरज असलेल्या व्यक्तीपर्यंत पोहोच करणे हा उद्देश आहे.
​ हा केवळ अन्नदानाचा उपक्रम नसून, त्यामागे माणुसकी, प्रेम आणि आपुलकीचा स्पर्श देण्याचा उद्देश आहे. या उपक्रमाची संकल्पना सोनू जोशी यांची असून, सहभागी महिलांनी जेवण देतानाचा एक फोटो किंवा छोटा व्हिडिओ ग्रुपमध्ये पाठवायचा आहे, जेणेकरून समाजातील इतर नागरिकांनाही यापासून प्रेरणा मिळेल. आतापर्यंत यामध्ये तब्बल पन्नासहून अधिक महिलांनी सहभाग नोंदवला आहे. या उपक्रमासाठी चेतना बडवे, रेखा कांबळे, अमृता सुर्वे, मनीषा समर्थ, पूनम महेंद्रकर, राखी येवले, रुपाली धनावडे यांचे सहकार्य मिळाले आहे.
याबाबत सोनू जोशी यांनी सांगितले, की या उपक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, ‘स्पर्श ममतेचा – भाग 2’ मध्ये ज्या महिला नियमितपणे आणि सर्व नियमांचे पालन करून सहभाग घेतील, त्यांचे विशेष कौतुक करण्यात येईल. घरच्या जेवणाच्या एका घासाने एखाद्या उपाशी व्यक्तीच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलवण्याचा हा छोटासा प्रयत्न समाजात नक्कीच एक नवा आदर्श निर्माण करेल. “माणुसकीचा स्पर्श देऊया आणि या सुंदर प्रवासाचाही भाग बनूया,” असे आवाहनही सोनू जोशी यांनी केले आहे.

* भुकेलेल्यांना अन्न देऊन लाभणारे आत्मिक समाधान :
एका सहभागी महिलेने सांगितले, की गणेश चतुर्थीच्या दिवशी उपवास असूनही त्यांनी एका गरजू आणि काम न करू शकणाऱ्या वृद्ध आजींसाठी घरी येऊन साबुदाणा खिचडी बनवली. आजींना जेवण दिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर जे निरागस आणि समाधानाचे हसू उमलले, ते पाहून स्वतःचेच पोट भरल्याची भावना निर्माण झाली.
रेखा कांबळे यांनी सांगितले, की प्रत्येकाच्या नशिबात पोटभर जेवण नसते, पण देव कोणा ना कोणा देवदूताला पाठवतो. या उपक्रमाच्या माध्यमातून दिलेला प्रत्येक घास हा केवळ अन्न नसून ते प्रेम, आपुलकी आणि समोरच्याला जगण्याची नवी उमेद देणारा आशीर्वाद आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading