Monday, July 6, 2026
Latest NewsPUNE

आजच्या तरुणाईत भारत कुठे आहे

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे कुलपती डाॅ. भूषण पटवर्धन यांचा प्रश्न

गुरुकुल प्रतिष्ठानतर्फे आदर्श माता – पिता तसेच आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण

पुणे : “आधुनिक काळातील आजच्या तरुणाईमध्ये भारत कुठे आहे,” असा प्रश्न ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि डेक्कन काॅलेज अभिमत विद्यापीठाचे कुलपती डाॅ. भूषण पटवर्धन यांनी शनिवारी येथे उपस्थित केला. “आजची युवा पिढी बघताना, मला त्यांच्या विचारात, आचारात, विहारात, आहारात..कुठेही भारतीयत्व आढळत नाही. नेमक्या कुठल्या मूल्य – निष्ठांवर या पिढीचा पाया आधारला आहे, हे समजत नाही”, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

निमित्त होते, गुरुकुल प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणा-या पुरस्कार प्रदानाचे. याप्रसंगी राजाराम रंगनाथ अष्टेकर आणि शकुंतलाबाई राजाराम अष्टेकर यांच्या स्मृत्यर्थ देण्यात येणारा आदर्श माता – पिता पुरस्कार जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील पिंपरी येथील शिक्षण संस्था चालक विजया आणि रामकिसन सोळंके यांना तर कृष्ण मोडक स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार ज्ञानप्रबोधिनी निगडी येथील केंद्रप्रमुख डाॅ. मनोज देवळेकर यांना डाॅ. पटवर्धन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि धनादेश, असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.

यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष कृष्णा अष्टेकर,कार्याध्यक्ष डाॅ. सागर देशपांडे, कार्यकारी संचालक सदानंद महाजन,विश्वस्त शिवप्रसाद कामत, मैथिली कामत, श्रीमती जाई कामत हे मान्यवर उपस्थित होते. कर्वे रस्त्यावरील अश्वमेध सभागृहात हा कार्यक्रम झाला.

डाॅ. पटवर्धन यांनी युवा पिढीच्या वर्तणुकीतील अभारतीयत्वाविषयी चिंता व्यक्त केली.” तंत्र-यंत्र, आयटी यावर धोरणे केंद्रित करणा-या आपल्या यंत्रणांचे मानव्यविद्याशाखांकडे दुर्लक्ष झाल्याने आपला समाज ज्वालामुखीवर बसून त्सुनामीची वाट पाहात आहे, अशी आजची परिस्थिती मला दिसते. महाराष्ट्राला संतपरंपरेमुळे समानतेचे अधिष्ठान लाभले. मुख्यतः वारकरी संप्रदायाने आपली संस्कृती टिकविण्याचे कार्य केले. आजही राज्याच्या ग्रामीण भागात संस्कृती टिकून राहिलेली दिसते, याचे श्रेय वारकरी संप्रदायाला दिले पाहिजे”, असे ते म्हणाले. या पार्श्वभूमीवर मराठवाड्याच्या दुर्लक्षित खेड्यात शिक्षणाचे महत्त्वाचे कार्य करणा-या सोळंके दांपत्याचा तसेच क्रीडासंस्कृतीची जोपासना करणा-या देवळेकर यांचा सन्मान दिलासा देणारा आहे. डाॅ. अशोक कामत हे विद्यापीठातले ज्येष्ठ स्नेही आणि मार्गदर्शक होते. अतिशय विद्वान, अभ्यासू, विद्यार्थीकेंद्रित विचार करणारे ते प्राध्यापक होते, असेही डॉ. पटवर्धन म्हणाले.

रामकिसन सोळंके मनोगत मांडताना म्हणाले, मी शेतकरी कुटुंबातला मुलगा शाळेत चौथीपर्यंत शिकलो आणि मग अभ्यासाचे दडपण वाटून शाळा सोडली. समस्यांचे संधीत रूपांतर करणे मला जमले आणि सामाजिक कार्याची आवड लागली. स्वतःला मूल होणार नाही, हे समजल्यावर समाजातील विद्यार्थी हीच आपली मुले, हा विचार कृतीत आणण्याचे ठरवले. पत्नीची समरसून साथ मिळाली आणि शैक्षणिक कार्य उभे राहिले. सामाजिक परिवर्तन शिक्षणाच्या माध्यमातूनच घडेल, यावर माझा विश्वास आहे.

देवळेकर म्हणाले, या पुरस्काराला मी पात्र ठरलो, ही गुरुकृपा आहे. मी ज्या संस्थेत कार्य करतो, ती ज्ञानप्रबोधिनी संस्था म्हणजे परिस आहे. त्याचा स्पर्श मला घडला आणि मला दिशा मिळाली. संतविचारांचे संस्कार शाळकरी जीवनापासूनच घडले. पुढे स्वतःमधील अहंकाराच्या विसर्जनाचे कार्य खेळांच्या माध्यमातून घडू शकते, हे समजले आणि क्रीडासंस्कृती रुजवण्यावर लक्ष केंद्रीत केले. क्रीडा विषयाचे नाते अनेक विद्याशाखांशी आहे. व्यक्तीच्या मनातील श्रेष्ठत्वाच्या भावनेला जाणीवपूर्वक सकारात्मकतेकडे नेण्याचे काम खेळ करतात. फक्त खेळातली हार नकारात्मक ठरत नाही. प्रयोगशीलता आणि भारतीय मातीशी जोडून ठेवणारे क्रीडाशिक्षण – प्रशिक्षण व्यक्तीला समानतेच्या, मित्रत्वाच्या पातळीवर आणते, असा माझा अनुभव आहे.

गुरुकुल प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष डाॅ. सागर देशपांडे यांनी प्रास्ताविकात रौप्य महोत्सवाच्या उंबरठ्यावर असलेल्या प्रतिष्ठानच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कृष्णा अष्टेकर यांनीही मनोगत व्यक्त केले.कार्यकारी संचालक सदानंद महाजन यांनी आभार मानले. अनिरुद्ध दडके यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading