fbpx
Thursday, December 7, 2023
Latest NewsPUNE

समाज सेवेसाठी संवेदना महत्वाची : सुहासराव हिरेमठ

पुणे : “निःस्वार्थ समाज सेवेसाठी संवेदना महत्वाची आहे. ही संवेदना कधीही क्षीण होता कामा नये. कारण संवेदनेतूनच समाजासाठी काम करण्याची प्रेरणा, उभारी मिळते,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ प्रचारक सुहासराव हिरेमठ यांनी केले.

भारतीय संस्कृती संवर्धक संस्थेला (मोतीबाग) जेष्ठ उद्योजक जयंत नातू आणि अश्वमेध परिवाराच्या वतीने एक कोटी रुपयांचा निधी समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. त्यावेळी हिरेमठ बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केंद्रीय कार्यकर्ते प्रा. अनिरुद्ध देशपांडे, भारतीय संस्कृती संवर्धक संस्थेचे अध्यक्ष राजीव जोशी, पुणे महानगर संघचालक रविंद्र वंजारवाडकर, उद्योजक जयंत नातू आदी उपस्थित होते.

सुहासराव हिरेमठ म्हणाले, “आजच्या काळात सर्व काही मिळेल; पण दानशूर आणि समाजासाठी काही करण्याची प्रेरणा असणाऱ्या दात्यांची कमी आहे. आजच्या या कार्यक्रमातून समाजालाही प्रेरणा मिळणार आहे. त्यांच्यातील संवेदना जागृत होण्यास मदत होणार आहे. प्रत्येकाने समाजासाठी, सेवा प्रकल्पासाठी संकल्प करायला हवा. दरवर्षी विशिष्ट रक्कम, वेळ सेवा प्रकल्पासाठी द्यावी. घरातील मंगलप्रसंगी सेवा प्रकल्पासाठी गरजूंना मदतीचा हात द्यावा.”

प्रा. अनिरुद्ध देशपांडे यांनी सांगितले की, भारतीय संस्कृतीमध्ये दातृत्व हा महत्वाचा गुण आहे. हा गुण जपण्याबरोबरच विकसित करण्याचा प्रयत्न करायला हवा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि समाज हे स्वतंत्र नाही तर एकरुप असे आहेत. समर्पण भावनेने काम करण्याची गरज आहे. ही भावना अशा कार्यक्रमामुळे वाढीस लागणार आहे. आजचा कार्यक्रम म्हणजे समर्पणाचे दर्शन घडवत आहे. 

जयंत नातू यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, राष्ट्रीय भावनेने काम करणारे कार्यकर्ते संघाच्या माध्यमातून तयार झाले आहेत. देशासाठी अनेक प्रचारक घडविले आहेत. समाज आणि संघाने आयुष्यात जे दिले त्याची परतफेड करता येत नाही; पण कर्तव्य भावनेतून हा निधी प्रदान करत आहे.

राजीव जोशी यांनी संघ कार्याची आणि मोतीबाग संस्थेच्या नवीन बांधकाम प्रकल्पाबाबत माहिती सांगितली. अशोक वझे यांनी स्वागत केले. ऍड. पद्मा गोखले यांनी सूत्रसंचालन व प्रास्ताविक केले. मेधावी नातू यांनी स्वागत संघ गीत सादर केले. डॉ. पुष्पा रानडे यांनी वंदे मातरम् सादर केले.

Leave a Reply

%d