कसब्यातील नागरिकांना दिवाळी गिफ्ट, जुने वाडे आणि इमारतींच्या पुनर्विकासाला मिळणार गती
पुणे ): पुणे शहराचा गावठाण भाग असणाऱ्या कसबापेठ परिसरात अनेक जुने वाडे आणि इमारती असून . सदरील मिळकती मोडकळीस आल्याने त्यांचे पुनर्विकसन होणे अत्यंत गरजेचे आहे. युडीसीपीआर नियमावलीनुसार घालण्यात आलेल्या एक मीटर साईड मर्जीन सोडण्याच्या अटीमुळे पुनर्विकसन करण्यास मोठा अडथळा निर्माण झाला होता. हा प्रश्न सोडवण्यासाठी कसबा विधानसभा भाजपा निवडणूक प्रमुख हेमंत रासने यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत सविस्तर चर्चा करत निवेदन दिले होते. तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून देखील पाठपुरावा करण्यात आला. गेली वर्षभरापासून रासने यांच्याकडून राज्य सरकार तसेच महापालिका स्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात आल्याने आज मिळकतधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
युडीसीपीआर नियमावलीतील एक मीटर साईड मर्जीन सोडण्याच्या नियमात शिथिलता आणत आता आता सहा मीटर रस्त्यावरील आणि एक हजार चौरस मीटरपेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या मिळकतींना हार्डशीप भरून साईड मार्जिनमध्ये सवलत देण्याचे परिपत्रक महापालिका आयुक्त यांनी प्रसिद्ध केले आहे. १८ मीटरपर्यंत आणि त्यापुढील खोलीच्या मिळकतींनाही हार्डशीप प्रीमियम आकारून साईड मार्जिन न सोडता बांधकाम करण्यास परवानगी देण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतल्याने जुने वाडे आणि इमारतींच्या पुनर्विकासाला गती मिळणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने महापलिकेच्या माध्यामातून कसब्यातील नागरिकांना दिवाळी भेट दिल्याचे मानले जात आहे.
याबद्दल बोलताना हेमंत रासने म्हणाले, कसबा विधानसभा मतदारसंघातील बांधकामांचा रखडलेला पुनर्वसनाचा प्रश्न सोडवण्यासाठी गेले वर्षभरापासून सातत्याने पाठपुरावा करीत आहे. यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी केलेल्या सूचनेनुसार महापालिका आयुक्तांनी यूडीसीपीआर नियमावली शिथिलता आणण्याचा निर्णय घेतला. तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून देखील पाठपुरावा करण्यात आला. आज महापालिका आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयामुळे गावठाण भागातील बांधकामाचा अनेक वर्षांपासून रखडलेला पुनर्विकास होणार आहे.