विजयादशमीला महाराष्ट्रीय मंडळ संस्थेचे १०० व्या वर्षांत पदार्पण
पुणे : कै कॅप्टन शिवरामपंत दामले यांनी १९२४ साली स्थापन केलेल्या महाराष्ट्रीय मंडळ या संस्थेने विजयादशमीला शताब्दी वर्षात पदार्पण केले. यानिमित्ताने सकाळी ७.३० च्या सुमारास संस्थेच्या वतीने टिळक रस्त्यावरील संस्थेच्या आवारातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. पुणे पोलिस विभागाच्या परिक्षेत्र १ चे उपायुक्त संदीप सिंह गिल यांच्या उपस्थितीत शोभायात्रेला सुरुवात झाली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले, कार्याध्यक्ष अविनाश घाटपांडे, सरचिटणीस रोहन दामले व संस्थेच्या शिक्षण विभागाच्या संचालिका नेहा दामले, इतर विश्वस्त आदी मान्यवर उपस्थित होते. या शोभायात्रेत संस्थेतील विद्यार्थी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी असे सर्वजण उत्साहाने सहभागी झाले होते.

शोभायात्रे दरम्यान विद्यार्थ्यांनी योगासने, मल्लखांब, लेझीम, लाठी-काठी यांची प्रात्यक्षिके सादर केली. संस्थेच्या विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्ती या विषयावर बसविलेले पथनाट्य हे शोभायात्रेचे आकर्षण ठरले. शोभायात्रे आधी पहाटे ५ वाजता संस्थेच्या टिळक रस्त्यावरील आवारात जोर मारण्याच्या कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये १५० जण सहभागी झाले होते. मुकुंदनगर येथील संस्थेच्या सभागृहात शोभायात्रेचा समारोप झाला.

