Thursday, September 3, 2026
Latest NewsPUNE

अंध मुलींनी नवरात्रात लुटला भोंडल्याचा आनंद

पुणे – ऐलोमा पैलोमा गणेश देवा….माझा खेळ मांडू देत करीन तुझी सेव….अशी भोंडल्याची पारंपारिक गाणी म्हणत कोथरूडच्या पुणे अंध शाळेतील मुलींनी नवरात्राचा आनंद लुटला. त्यांच्या या आनंदात सहभागी होत “माय भवानी तुझे लेकरू कुशीत तुझीया येई (या मुलींची) सेवा मानून घे आई” असे गा-हाणे मातेच्या चरणी पार्श्वगायिक गोडबोले हिने सूरातून घातले. निमित होते अंध मुलींना नवरात्राचा आनंद मिळवून देण्यासाठी संवाद पुणे आणि समर्थगड या संस्थांनी संयुक्तपणे पुणे ब्लाइंड स्कूलच्या मुलींच्या शाळेत आयोजित केलेल्या भोंडल्याचे.

पुण्यात अंधांसाठी १९३४ साली पहिली शाळा सुरू झाली. तेथे मुले व मुली एकत्रच शिकत होते. नंतर १९७५ साली कोथरूडला मुलींसाठी स्वतंत्र निवासी शाळा सुरू झाली. या शाळेत सध्या १२६ मुली शिकत आहेत. विशेष म्हणजे शाळेतील सर्व स्टाफ दिव्यांग नसला तरी शाळेचे मुख्याध्यापक दमोदर सरगम सर हे अंध असून ते कोरगावपार्क येथील शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. या मुलींसाठी नवरात्रानिमित्त भोंडल्याचे आयोजन करण्यात आले होते.
मुलींच्या भोंडल्यात अंध मुलींसोबत कवयत्री अस्लेषा महाजन, लेखिका विनिता पिंपळखरे, पार्श्वगायिका योगिता गोडबोले, डॉ. लीना बोरूडे, नृत्यदिग्दर्शिका निकीता मोघे, सायली किणीकर, संस्थेच्या वर्षा राणे, केतकी बोरकर आणि समर्थग़ड संस्थेच्या अध्यक्षा रेखा पुराणिक आदी मान्यवर भोंडल्याच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या शिवाय किशोर सरपोतदार, संवाद पुणेचे सुनील महाजन, शाळेचे मुख्याध्यापक दामोदर सरगम सर, यांच्यासह पालकही उपस्थित होते.

भोडल्यासाठी अनेक मुलींनी साड्या परिधान केल्या होत्या. तर अनेक मुलींनी आकर्षक पेहराव केले होते. आडात पडला शिंपला आमचा भोंडला संपला असे म्हणत भोडल्याची सांगता झाली. मुलींनी समोसा, ढोकळा, बुंदीचे लाडू, केक अशा सर्व खिरापतही ओळखल्या. त्यानंतर मान्यवरांनी मुलींशी संवाद साधला. कवयत्री महाजन यांनी ‘पोपटा पोपटा बोल रे….’, विनीता पिंपळखऱे यांनी शेपटी असती माणसाला किती झाले असते बरे, तेच रूप माणसाला शोभून दिसते खरे…’, या कविता मुलींना म्हणून दाखवत त्यांनाही म्हणालया लावल्या. योगिता गोडबोले हिने माय भवानी तुझे लेकरू……हे गाण म्हटले. डॉ. लीना बोरूडे यांनी रोज खूप खेळा, भरपूर खा आणि मस्त झोप घेऊन चांगले आरोग्य मिळवा. चांगल्या आरोग्यामुळे तुम्हाला तुमचे धेय्य साध्य करणे अधिक सोपे होईल असा कानमंत्र दिला. नृत्यदिग्दर्शिका निकीता मोघे यांनी या शाळेच मदत नको संधी द्या या घोष वाक्याने आपल्याला भारावून टाकले असल्याचे सांगत मुलींना नृत्य शिकवायाला येण्याचे मान्य केले. समर्थगडच्या रेखा पुराणिक यांनी त्यांच्या शाळेची महिती देऊन सर्व मुलींना त्यांच्या आश्रम शाळेत घेऊन जाणार असल्याचे सांगितले.
सुमारे तासभर चाललेल्या या कार्यक्रमासाठी खास आलेल्या पूना गेस्ट हाऊसच्या किशोर सरपोतदार यांनी मुलींना मोदक तयार करायला शिकवण्यासाठी आपण शाळेत येऊ असे सांगितले. शेवटी मुख्याध्यापक दामोदर सरगम सरांनी सर्वांचे आभार मानले.


Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading