भारतीय सैनिकांच्या देशसेवेला श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे देवीभक्तांचा सलाम
पुणे : देशाच्या सिमेवर लढताना शारीरिक अपंगत्व आलेल्या व गंभीर दुखापत झालेल्या भारतीय लष्करातील सैनिकांचा सन्मान करीत त्यांच्या कार्याला श्री महालक्ष्मी मंदिर आणि देवी भक्तांतर्फे सलाम करण्यात आला. भारत माता की जय… च्या जयघोषाने मंदिराचा परिसर दुमदुमून गेला.
निमित्त होते, श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने सार्वजनिक नवरात्र उत्सवात मंदिरात आयोजित सैनिकांच्या सन्मान सोहळ्याचे. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर, क्वीन्स मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूट्स चे कर्नल वसंत बल्लेवार, कर्नल संजय बोरसे, सामाजिक कार्यकर्ते शिरीष मोहिते, ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अॅड. प्रताप परदेशी, तृप्ती अग्रवाल, भरत अग्रवाल, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर यांसह विश्वस्त व पदाधिकारी उपस्थित होते. महावस्त्र, श्रीफळ, सन्मानचिन्ह असे सन्मानाचे स्वरूप होते. यावेळी त्यांच्या हस्ते आरती देखील करण्यात आली.
कर्नल वसंत बल्लेवार म्हणाले, अनेक सैनिकांना सीमेवर पहारा देताना किंवा एखाद्या चकमकीमध्ये दुखापत होते. त्यांना आधार देत पुन्हा एकदा मानसिक दृष्ट्या स्वतः: च्या पायावर उभे करण्याचा आपला प्रयत्न असतो. या सैनिकांना मंदिरात बोलावून सन्मानित केले असल्याने प्रत्येकजण अतिशय आनंदी आहे.
*विविध कंपन्यांमधील महिला एचआर चा सन्मान
पुण्यामधील विविध नामांकित कंपन्यांमधील महिला एचआर चा सन्मान मंदिरात करण्यात आला. यावेळी क्विक हिल टेक्नॉलॉजीचे सीईओ डॉ.संजय काटकर, ट्रस्टच्या तृप्ती अग्रवाल, भरत अग्रवाल, प्रवीण चोरबेले आदी यावेळी उपस्थित होते.
डॉ.संजय काटकर म्हणाले, प्रत्येक कंपनीमध्ये चांगली माणसे आणि त्यांचे संघटितपणे काम आवश्यक असते. तंत्रज्ञान आवश्यक असले, तरी देखील माणसाला महत्व अधिक आहे. यांचे व्यवस्थापन करण्याचे काम एचआर करत असतात. महिला हा विभाग अत्यंत चांगल्या पद्धतीने सांभाळतात.
भरत अग्रवाल म्हणाले, मागील १० वर्षात एचआर ला महत्व आले आहे. तंत्रज्ञाना पेक्षा मानवी विचारांना अधिक महत्व आहे. त्यामुळे सर्व तरुणींनी या महिला एचआर कडून आदर्श घेऊन पुढे वाटचाल करायला हवी.
