Thursday, September 3, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार रोहित पवार ‘युवा संघर्ष यात्रा’ काढणार

पुणे : राजकारणात कोणताही मुद्दा आम्ही मांडला की, आमचे वय विचारले जाते. तुम्हाला काही समजत नाही, तुम्हाला राजकारण कळत नाही, तुम्हाला अजून बरेच काम करायचे आहे, अशी टीका केली जाते. मात्र, टीका करणारे लोकांना समजून घेतात का? तरुणांना विचारात घेतात का?, असा सवाल शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत केला.
तसेच, सध्याचे सरकार एसीमध्ये बसून अधिकारी हाताशी धरून वस्तुस्थिती लक्षात न घेता धोरण ठरवत आहे. आताचे सरकार खोटारडे असून ते कोणतेही धोरण ठरवताना व्यवसायिक विचार करत असल्याची टीका रोहित पवार यांनी केली.

रोहित पवार पुणे ते नागपूरदरम्यान ‘युवा संघर्ष यात्रा’ काढणार आहे. यात्रेविषयी माहिती देताना रोहित पवार म्हणाले, २५ ऑक्टोबर रोजी ही यात्रा पुण्यातून निघणार आहे. ४२ दिवसांच्या या यात्रेत एकूण ८०० किलोमीटरचा प्रवास करण्यात येणार आहे. राज्यात एकूण लोकसंख्येच्या ४० टक्के युवा वर्ग आहे. तो आपल्या राज्याचे भविष्य असून त्यांच्या पूर्ण क्षमतेच्या वापर करण्यासाठी सरकारकडून आवश्यक ते प्रोत्साहन मिळत नाही. सध्या राज्यात बेरोजगारीचा वाढता दर, परीक्षा आयोजनातील विलंब, पेपरफुटी, अवाजवी परीक्षा शुल्क, कंत्राटी नोकऱ्या, रोजगार दुसऱ्या राज्यात जाणे अशा अनेक समस्याने युवकांचे भविष्य धोक्यात आले आहे.
रोहित पवार म्हणाले, व्यक्तिगत जीवनात युवकांना अनेक वेळा विविध गोष्टी मिळण्यासाठी संघर्ष करावा लागतो. मोठ्या कुटुंबातून एखादा व्यक्ती आल्यावर त्याला सहज गोष्टी मिळतात असे सांगितले जाते. पण मला व्यक्तिगत जीवनात संघर्ष करावा लागला. आज बेरोजगारीचे प्रमाण मोठे असून ते ३० टक्क्यांपर्यंत आहे. सरकार युवकांना आवश्यक रोजगार पुरवत नाही. बेरोजगारीचे प्रमाण आज मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दरवर्षी राज्यातून दीड लाख मुले अभियंता होतात पण त्यापैकी ४८ टक्के जणांना रोजगार मिळत नाही. त्यामुळे ते स्पर्धा परीक्षाकडे वळतात. परंतु, परीक्षा पद्धत भरती आणि निकाल यात सावळा गोंधळ आहे. एमपीएससीला सक्षम करणे गरजेचे आहे. तलाठी परीक्षेत भरतीसाठी २० लाख रुपये घेतले जात असतील तर गरीब कुटुंबातील मुले कशी अधिकारी होतील. एमआयडीसीमध्ये नवीन कंपन्या येत नाही. ज्या ठिकाणी कंपन्या येण्यास इच्छुक असतील त्यात राजकारण केले जाते. मोठ्या शहरात आयटी कंपन्या येण्यासाठी धोरण राबवले जाते. परंतु इतर शहरात त्या कंपन्या जाण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले जात नाही.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading