‘टोल’च्या मुद्द्यावर राज ठाकरे आक्रमक; टोलनाके जाळण्याचा सरकारला दिला इशारा
मुंबई : टोलच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पोलखोल केली आहे. देवेंद्र फडणवीस टोलच्या मुद्द्यावरून धांदात खोटं बोलत आहेत, असं सांगतानाच टोल हा काही काश्मीरचा विषय नाही. टोल रद्द केले नाही तर आम्ही टोल नाके जाळून टाकू असा संतप्त इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. तसेच, टोलचे पैसे नेमके जातात कुठे? असा सवालही राज ठाकरेंनी आजच्या पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे.
पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, “ठाण्यातील पाच टोलनाक्यांवर दरवाढ झाली, त्याविरोधात मनसे नेते अविनाश जाधव उपोषणाला बसले होते. मी कालही याबाबत बोललो होतो, पण मुद्दाम आज पुन्हा सांगतोय. मला यासंदर्भात राज्य सरकारकडून एक पत्र आलं, त्या पत्रात एक स्तंभ होता. त्यात कोणत्या वाहानांना टोल आहे आणि कोणत्या वाहानांना टोल नाही, हे नमूद करण्यात आलं होतं. साधारणतः 2010 मध्ये टोल आंदोलन सुरू झालं. टोलचा सर्व पैसा कॅशमधला पैसा, याचं होतं काय? त्याच-त्याच कंपन्यांना हे टोल कसे मिळतात? शहरांमधल्या रस्त्यांवर खड्डेच पडणार असतील मग हा पैसा जातो कुठे?”
मनसेच्या टोलच्या आंदोलनानंतर त्यावेळी राज्यात शिवसेना-भाजपच्या युतीचं सरकार होतं. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशी आघाडी होती. आता काय आहे? हे कोणालाच माहिती नाही. पण त्यावेळी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस काय म्हणालेले, हे काही क्लिपमधून पाहुयात, असं म्हणत राज ठाकरेंनी एक-एक मिनिटांच्या क्लिप पत्रकार परिषदेत दाखवल्या. देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या टोलनाक्यासंदर्भातील क्लिप दाखवल्या. मनसेनं आंदोलन करुन अधिकृत आणि अनधिकृत असे 67 टोलनाके बंद केले होते. अजित पवार व्हिडीओमध्ये ज्या 44 टोलनाक्यांबाबत बोलत आहेत, ते मनसेनं त्यांच्यावर दबाव टाकून बंद करायला लावले असल्याचं राज ठाकरे म्हणाले.
दरम्यान, टोल हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा स्कॅम आहे. मला असं वाटतं याची शहानिशा झाली पाहिजे. येत्या दोन दिवसांत मी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. त्यांच्याकडून काय उत्तर येतंय ते पाहू. नाहीतर आता उपमुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे जर टू व्हिलर, फोर व्हिलरला टोल नाहीये, तर आमची माणसं प्रत्येक टोलनाक्यावर उभी राहतील आणि टू व्हिलर, फोर व्हिलरला टोल लावू दिला जाणार नाही. जर याला विरोध करायचा प्रयत्न केला तर हे टोलनाके आम्ही जाळून टाकू असेही राज ठाकरे म्हणाले.
