अखिल भारतीय आंतरकारागृह बुद्धिबळ स्पर्धेत येरवडा कारागृह सलग दुसऱ्यांदा विजेते
पुणे : शनिवारी पार पडलेल्या अखिल भारतीय आंतर कारागृह बुद्धिबळ स्पर्धेत सर्व फेऱ्यांमध्ये अपराजित रहात येरवडा मध्यवर्ती कारगृह संघाने सलग दुसऱ्यांदा विजेतेपदाचा मान मिळविला.
परिवर्तन – प्रिझन टू प्राईड या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड च्या उपक्रमा अंतर्गत अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेने आयोजित केलेल्या या स्पर्धा नुकत्याच पार पडल्या.
या स्पर्धेत भारतातील विविध राज्यांमधील 19 मध्यवर्ती कारागृहातील बंदीच्या संघांनी भाग घेतला होता.
दि.26 रोजी 6 प्राथमिक फेऱ्या खेळवल्या गेल्या त्यातून अंतिम 4 संघांची निवड करण्यात आली. यामध्ये 6 पैकी 6 सामने जिंकत येरवडा, पुणे संघ प्रथम स्थानावर राहिला.
दि.27 सप्टेंबर रोजी झालेल्या स्पर्धेत येरवडा संघाने बंगलोर आणि भुवनेश्वर संघाचा पराभव करत विजेतेपद पटकावले आणि ऑक्टोबर मध्ये होणाऱ्या जागतिक आंतर कारागृह स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळविला.
येरवडा मध्यवर्ती कारागृह पुणे, भुवनेश्वर आणि बंगलोर कारागृह असे तीन संघ या स्पर्धेतून जागतिक स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.
वरील स्पर्धेसाठी अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेतर्फे पवन कातकडे हे स्पर्धा अधिकारी म्हणून उपस्थित होते.
अमिताभ गुप्ता, अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधार सेवा महाराष्ट्र राज्य,येरवडा पुणे. स्वाती साठे, कारागृह उप महानिरीक्षक, पश्चिम विभाग येरवडा, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली मागील वर्षांपासून IOCL मार्फत परिवर्तन- प्रिझन टू प्राईड हा उपक्रम येरवडा मध्यवर्ती कारागृहात सुरू आहे.
या उपक्रमा अंतर्गत IOCL ने नियुक्त केलेले केतन खैरे हे कारागृहातील बंदीना प्रशिक्षण देत आहेत. योगेश परदेशी हे उपक्रमाचे समन्वयक आहेत. ऑनलाईन स्पर्धा व त्याच्या सरावासाठी लागणाऱ्या कंप्युटर, नेटवर्किंग चे तांत्रिक सहाय्य गणेश माळकरी करीत आहेत. या साठी IOCL चे ग्रॅंड मास्टर अभिजित कुंटे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
वरील स्पर्धेतील सहभागी बंदी संघाला सुनील ढमाळ, अधीक्षक, येरवडा मध्यवर्ती कारागृह पुणे यांनी शुभेच्छा दिल्या.
डॉ.भाईदास ढोले, उपअधीक्षक, पल्लवी कदम उपअधीक्षक, रवींद्र गायकवाड, उपअधीक्षक, एच एच जगताप, उपअधीक्षक, आनंद कांदे, वरिष्ठ तुरुंग अधिकारी व वि. के.खराडे सुभेदार यांनी वरील उपक्रमाचे काटेकोर नियोजन करीत बंदी संघास आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
