देवीच्या रूपांची महती सांगणारे ‘आदिशक्ती’ रंगावली प्रदर्शन सोमवारपासून
पुणे : महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग म्हणजे देवी-देवता. पुण्यातील २० हून अधिक रंगावली कलाकारांनी अशीच देवीची विविध रूपे रंगावलीच्या माध्यमातून साकारली आहेत. देवीच्या रूपांची महती सांगणारे ‘आदिशक्ती’ रंगावली प्रदर्शन दिनांक २ ते ५ आॅक्टोबर दरम्यान सकाळी ९ ते रात्री ९ यावेळेत बालगंधर्व कलादालन येथे पुणेकरांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे, अशी माहिती प्रदर्शनाच्या आयोजक रंगावलीकार शारदा अवसरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सोमवार, दिनांक २ आॅक्टोबर रोजी सकाळी १० वाजता पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी प्रख्यात रंगावलीकार अक्षय शहापूरकर, कथक नृत्यांगना नेहा मुथियान, जगदीश चव्हाण यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
शारदा अवसरे म्हणाल्या, प्रदर्शनामध्ये एकूण १८ रंगावलींचा समावेश आहे. नवरात्रीमधील देवीची ९ रूपे आणि दररोजच्या पूजेतील ९ देवीची रूपे रंगावलीच्या माध्यमातून साकारण्यात आली आहेत. यामध्ये शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धीदात्री यांसह पुण्याचे ग्रामदैवत श्री तांबडी जोगेश्वरी, नाशिकची सप्तशृंगी, माहूरची रेणुका माता, कोल्हापूरची अंबाबाई, तुळजाभवानी, सरस्वती देवी, दुर्गा देवी, महाकाली आणि महिशासूरमर्दिनी या देवीच्या विविध रुपांची रंगावली असणार आहे. तब्बल ३० हून अधिक कलाकारांनी दोन दिवस सलग रंगावली रेखाटल्या आहेत. सर्व रंगावली काढण्याकरिता एकूण ३० किलो रंगावली व रंगाचा वापर करण्यात आला आहे.
प्रदर्शनाकरिता श्रीरंग कलादर्पण फाऊंडेशनचे प्रतीक अथाने आणि गोल्डन ड्रिप अँड अॅग्रो अलाईड, पुणे चे आशुतोष बगाडे यांनी विशेष सहकार्य केले आहे. हे प्रदर्शन गुरुवार, दिनांक ५ आॅक्टोबर पर्यंत दररोज सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत विनामूल्य खुले असून पुणेकरांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही शारदा अवसरे यांनी केले आहे.
