गणपती मंडळात महिला ‘पडद्यामागच्या कलाकार’ -खासदार अॅड.वंदना चव्हाण
पुणे : गणपती मंडळांमध्ये महिलांना पुढे येण्याची फारशी संधी मिळत नाही. मात्र पडद्यामागे त्या अनेक गोष्टी करत असतात. ‘पडद्यामागचे कलाकार’ बनवून गणेश मंडळात कार्य करणाऱ्या महिलांना तुळशीबाग मंडळांने एक दिवस पुढे येऊन काम करण्याची दिलेली संधी हा उपक्रम कौतुकास्पद आहे, असे मत खासदार अॅड. वंदना चव्हाण यांनी व्यक्त केले.
मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळ ट्रस्ट चे यंदा १२३ हे वर्ष आहे. त्यानिमित्ताने उत्सव मंडपात तुळशीबाग स्त्रीशक्ती सन्मान सोहळा २०२३ आयोजन करण्यात आले. सिनेअभिनेत्री डिंपल चोपडे, मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, उपाध्यक्ष विनायक कदम, कोषाध्यक्ष नितीन पंडित, डॉ. शैलेश गुजर, अभिनेत्री वाळके, सुनंदा इप्ते, सुरेखा दिवेकर, प्रियांका डोंगरे,स्वप्नाली पंडित, विशाखा पवार, कांचन कदम आदी उपस्थित होते.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या स्वाती नगरकर, निलांबरी रानडे, सविता केळकर, सुनिता राजे पवार, अनघा घैसास, प्रतिभा जोशी यांना तुळशीबाग स्त्रीशक्ती सन्मान देऊन गौरविण्यात आले. सन्मानपत्र, गणेशाची प्रतिमा व महावस्त्र असे सन्मानाचे स्वरूप होते.
अॅड. वंदना चव्हाण म्हणाल्या, विविध क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. आयुर्वेद क्षेत्रात देखील महिलांचे काम मोठे आहे. आयुर्वेद हा एक महत्त्वाचा घटक आहे. आयुष मंत्रालय याविषयी काम करत असले तरी अनेक मंडळी याविषयी काम करत आहेत, हे कौतुकास्पद आहे.
डिंपल चोपडे म्हणाल्या, माझी आई सामाजिक क्षेत्रात देखील कार्यरत आहेत. त्यामुळे अभिनयासोबतच मी सामाजिक कार्यात सहभागी होते.
नितीन पंडित म्हणाले, शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणारा पुण्यातील मानाचा चौथा महागणपती तुळशीबाग गणपती आहे. तुळशीबाग आणि महिला यांचे एक अतुट नाते आहे. तुळशीबाग बाजारपेठ ही महिलांचे माहेरघर म्हणून ओळखली जाते. त्या अनुषंगाने गणेशोत्सवात “एक दिवस महिलांचा” हा उपक्रम मंडळातर्फे आयोजित केला जातो. त्यावेळी मंडळाच्या गणेश उत्सवाचे एक दिवसाचे संपूर्ण व्यवस्थापन महिला सदस्या करतात. तसेच त्यानिमित्ताने समाजातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांना सन्मानित करण्यात येते.
