fbpx
Tuesday, September 26, 2023
Latest NewsPUNE

पर्यावरणाच्या संवर्धनासाठी नियमितपणे सायकल चालवली पाहिजे – मेधा कुलकर्णी

पुणे : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून पुणे ऑन पॅडल्स या भव्य सायकल रॅलीचे आयोजन माजी आमदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी  छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, कोथरूड या ठिकाणी  केले होते. या रॅलीमध्ये २ हजार पेक्षा जास्त सायकल प्रेमींनी हजेरी लावली होती. पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, भाजपचे पुणे शहराचे अध्यक्ष धीरज घाटे, प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या शुभहस्ते या रॅलीचा फ्लॅग ऑफ  करून सायकल रॅलीला सुरुवात केली होती.

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोथरूड येथून सायकल रॅलीची सुरुवात झाली व झाशीची राणी पुतळा बालगंधर्व येथे सांगता करण्यात आली. या सहभागी
प्रत्येक व्यक्तीस एक टी-शर्ट, मेडेल, प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

डॉ. प्रा. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, की पुणे हे सायकलींचे शहर म्हणून ओळखले जाते. शहरात मोठ्या प्रमाणात सायकल प्रेमी आहेत. सर्व वयोगटातील लोकांसाठी, मुलांसाठी, खेळाडूंसाठी सायकल चालवणे हा पर्यावरणपूरक असा एक उत्तम व्यायाम प्रकार आहे. शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी यावर एक उत्तम उपाय म्हणजे प्रवासासाठी सायकलचा वापर करणे हे आरोग्यास उत्तम ठरू शकते. प्रदूषण रोखणेसोबत शारीरिक आरोग्यासाठी सायकल चालवणे उत्तम व्यायाम ठरतो. त्यामुळे सर्वांनी नियमितपणे सायकल चालवली पाहिजे.

डॉ. सुरेश गोसावी म्हणाले की प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी सायकल रॅली हा राबविलेला उपक्रम कौतकास्पद आहे. उत्तम आरोग्यासाठी व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सायकलचा वापर केला पाहिजे. येवढ्या सकाळी २ हजार पेक्षा जास्त सायकल प्रेमींनी लावलेली उपस्थिती प्रत्येकाला प्रेरणा देणारी आहे.

धीरज घाटे म्हणाले की देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसनिमित्ताने आयोजित केलेला सायकल रॅलीचा उपक्रम काळाची गरज आहे. असे उपक्रम नियमित व्हायला हवेत.

तसेच फिटनेस जगतातील दिग्गज गजानन खैरे, अजित पाटील, दिग्विजय जेधे, अजय देसाई , लहू उघडे, सुविधा कडलग,  अंजली भालिंगे , डॉ. ओंकार थोपटे , गगन ग्रोव्हर , रवी नागणे तसेच प्रसिद्ध सायकल पटू निलेश मिसाळ, मारुती गोळे , सुनील कुकडे, प्रीती मस्के, कल्याणी टोकेकर, शंकर गाढवे,  राहुल नलावडे,  बाळकृष्ण नेहरकर, आनंद कंसल आदींनी या सायकल रॅलीमध्ये सहभागी झाले होते. या सर्वांचे सत्कार करण्यात आले. अशी माहिती प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी  यांनी दिली. सूत्रसंचालन मृणालिनी जोशी यांनी केले तर आभार निवेदिता नहार यांनी मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: