‘एक देश, एक निवडणुक’ समितीची २३ सप्टेंबरला पहिली बैठक
भुवनेश्वर : देशात एकाचवेळी निवडणुका घेण्याच्या शक्यता पडताळून पाहण्यासाठी आणि याबाबत शिफारशी करण्यासाठी सरकारने ८ सदस्यीय समिती गठित केली आहे. या समितीचे प्रमुख माजी राष्ट्रपती कोविंद असून त्यांच्या अध्यक्षतेखाली २३ सप्टेंबर रोजी पहिली उच्चस्तरीय बैठक होणार आहे. या समितीचे अध्यक्ष रामनाथ कोविंद यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, समितीची पहिली बैठक २३ सप्टेंबर रोजी होणार आहे. एका खासगी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात सहभागी होण्यासाठी ते भुवनेश्वर येथे आले होते.
यापूर्वी केंद्रीय कायदा मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ३ सप्टेंबर रोजी माजी राष्ट्रपतींची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी माजी राष्ट्रपती कोविंद यांना प्राथमिक माहिती दिली होती. केंद्र सरकारने २ सप्टेंबर रोजी ‘एक देश, एक निवडणूक’ या विषयावर आठ सदस्यीय समिती स्थापन केली आहे. कायदा मंत्रालयाने याबाबत अधिसूचनाही जारी केली आहे. राष्ट्रहिताच्या दृष्टीने देशात एकाचवेळी निवडणुका घेणे महत्वाचे असल्याचे केंद्राचे म्हणणे आहे.
या समितीचे अध्यक्ष माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे आहेत. तसेच, या समितीमध्ये गृहमंत्री अमित शहा, काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी, गुलाम नबी आझाद, एनके सिंग, सुभाष सी कश्यप, हरीश साळवे आणि संजय कोठारी हे सदस्य आहेत. पण अधीर रंजन चौधरी यांनी या समितीत सामील होण्यास नकार दिला आहे. केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल या बैठकीला निमंत्रित पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. विधी विभागाचे सचिव नितेन चंद्रा हे उच्चस्तरीय समितीचे सचिव म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.