डॉ. जगन्नाथ दीक्षित आणि अडोर ट्रस्टचे दोन विश्व विक्रम!
पुणे : स्थुलत्व आणि मधुमेह मुक्त विश्व अभियान राबवणाऱ्या डॉ. जगन्नाथ दीक्षित आणि त्यांच्या अडोर ट्रस्टने नुकतीच दोन विश्व विक्रमांची नोंद केली आहे. अमेरिकेच्या वर्ल्ड रेकॉर्ड कम्युनिटीतर्फे या दोन्ही विक्रमांना मान्यता देखील देण्यात आली आहे.
अभियानाचे प्रेरणास्थान असलेल्या कै. डॉ. श्रीकांत जिचकार यांच्या जयंतीचे औचित्य साधून दिनांक १० सप्टेंबर रोजी दीक्षित लाईफ स्टाईल अंगिकारणाऱ्या जगभरातील सर्वांना आपापल्या स्थानिक वेळेनुसार सकाळी ६ ते ९ या वेळात ५ किमी चालण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला लोकांनी खूप मोठा प्रतिसाद दिला. भारतासह एकूण ११ देशातील लोक १० सप्टेंबर ला चालले. जगभरात २२८ ठिकाणी लोक चालले. यात भारतातील १९९ तर इतर देशातील २९ ठिकाणांचा समावेश होता! ‘सर्वाधिक ठिकाणी आयोजित झालेली वॉक मॅरेथॉन ‘ अशी या विश्व विक्रमाची नोंद झालेली आहे हे विशेष.
दिनांक १६ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर २०२३ या २२ दिवसात डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी भारताच्या दक्षिण भागातील कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांचा अभियानाच्या प्रचार आणि प्रसारासाठी दौरा केला. या दरम्यान त्यांनी ५,९४५ किमी कारने प्रवास केला आणि २५ शहरातील ३४ वैद्यकीय महाविद्यालयात आणि इन्फोसिस, अराजेन लाईफ सायन्सेस, महाराष्ट्र मंडळ आणि यशोदा हॉस्पिटल अशा ५ इतर संस्थांमध्ये ‘दीक्षित जीवनशैलीच्या माध्यमातून स्थुलत्व आणि मधुमेह मुक्ती’ या विषयावर ४० व्याख्याने दिली. ‘लाँगेस्ट डायबेटिज अवेअरनेस कॅम्पेन बाय अॅन इंडिव्हिज्युअल’ अशा बिरुदाने वर्ल्ड रेकॉर्ड कम्युनिटीने या विश्व विक्रमाची नोंद केली.
या दोन्ही उपक्रमांचा जगभरात लोकांना मधुमेह आणि लठ्ठपणा या दोहोंवर औषधे न घेता केवळ जीवनशैलीच्या माध्यमातून परिणामकारकरित्या मात करता येते, हे लक्षात येण्यासाठी नक्कीच उपयोग होईल. या विश्व विक्रमांसाठी सर्व नागरिकांतर्फे अडोर ट्रस्टचे अभिनंदन करण्यात येत आहे.
पुढील वर्षी एकाच शहरात जास्तीत जास्त लोक ५ किमी चालतील आणि आपण त्याचा विश्व विक्रम करू असा विश्वास डॉ.जगन्नाथ दीक्षित यांनी यावेळी व्यक्त केला.