सर्वोत्तम सुविधा व सुरक्षा पुरस्कार स्पर्धा ही सामाजिक सुरक्षिततेला नवी दिशा देणारी चळवळ
क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष रणजीत नाईकनवरे यांचे प्रतिपादन
पुणे : कामगार हा बांधकाम क्षेत्राचा कणा आहे. त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी क्रेडाई पुणे मेट्रो वचनबद्ध आहे. कामगारांचे कल्याण, त्यांच्या सामाजिक जीवनाची उन्नती आणि आकांक्षा वृद्धीसाठी क्रेडाई पुणे मेट्रो अनेकविध उपक्रम हाती घेत आहे. सर्वोत्तम सुविधा व सुरक्षा पुरस्कार स्पर्धा हे या अंतर्गत घेतलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल असून या चळवळीमुळे सामाजिक सुरक्षिततेला एक नवी दिशा मिळून बांधकाम उद्योगाचा आणि समाजाचा दृष्टिकोन बदलेल, असे प्रतिपादन क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष रणजीत नाईकनवरे यांनी केले.
क्रेडाई पुणे मेट्रोच्या कामगार कल्याण समितीच्या माध्यमातून उत्कृष्ट सुविधा (बेस्ट फॅसिलिटी) आणि सुरक्षा पुरस्कार (सुरक्षा) स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन नुकतेच क्रेडाई पुणे मेट्रोच्या कार्यालयात संपन्न झाले. क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष रणजित नाईकनवरे, सचिव अश्विन त्रिमल, निमंत्रक सपना राठी, सह-निमंत्रक मिलिंद तलाठी आणि पराग पाटील, महासंचालक डॉ. डी. के. अभ्यंकर, तसेच पीसीईआरएफ आणि सीक्यूआरएमधील ज्युरी सदस्यांच्या तज्ज्ञ मंडळासह अन्य सदस्य यावेळी उपस्थित होते.
सर्वोत्कृष्ट सुविधा आणि सुरक्षा पुरस्कार स्पर्धेसाठी प्राईड ग्रुप व विलास जावडेकर ग्रुप हे मुख्य प्रायोजक म्हणून तर एसजे कॉन्ट्रॅक्ट्स ग्रुप हे सहप्रायोजक म्हणून सोबत असतील.
यावेळी बोलताना नाईकनवरे म्हणाले, “बांधकाम क्षेत्रातील सर्वोत्तम कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी आणि त्यांना चालना देण्यासाठी क्रेडाई पुणे मेट्रो आपल्या विशेष कामगार कल्याण समितीच्या माध्यमातून अथकपणे प्रयत्नशील आहे. कोणत्याही विकासशील समुदायाला सुरक्षिततेच्या विषयावर तडजोड करता येत नाही. कामगार आणि रहिवासी दोहोंचे कल्याण साधण्याच्या आमच्या वचनबद्धतेतूनच ही नावीन्यपूर्ण संकल्पना आकारास आली आहे. आमच्या सर्वोत्कृष्ट सुविधा पुरस्कार स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही गेली अनेक वर्षे बांधकाम क्षेत्रातील सुविधांचा गौरव करीत आलो आहोत. या क्षेत्रात सतत बदलत असलेल्या स्वरूपाच्या पार्श्वभूमीवर, आम्ही सुरक्षितता पुरस्कार स्पर्धा सुरु केली आहे. भारताच्या बांधकाम विकास क्षेत्रात ही अशा स्वरूपाची पहिलीच स्पर्धा आहे.”
क्रेडाई-पुणे मेट्रोच्या या अनोख्या उपक्रमाला विकसक समूहांचा उत्तम पाठिंबा लाभला आहे. यामुळे सुरक्षाविषयक जागरूकता आणि विविध कामगार कल्याण उपक्रमांच्या अंमलबजावणीला पुणे आणि महाराष्ट्रातील बांधकाम क्षेत्रात मोठी चालना मिळणार आहे, याकडे नाईकनवरे यांनी लक्ष वेधले.
या दोन्ही स्पर्धांसाठी आम्हाला मिळालेला प्रतिसाद आणि पाठबळ हे उल्लेखनीय उल्लेखनीय होते. यासाठी १५० हून अधिक सदस्य विकसकांकडून आम्हाला प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
कामगार नोंदणी, बीओसीडब्ल्यू अंतर्गत लाभांची उपलब्धता, मोफत कामगार सल्लागार मंचाची निर्मिती, बांधकाम कार्यस्थळी घ्यावयाची काळजी आणि सावधगिरीच्या उपाययोजनांविषयी सदस्यांना मार्गदर्शन करणे, आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करणे, लसीकरण कार्यक्रम, बांधकामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांच्या मुलांसाठी बालवाड्या, शाळा यांसारखे उपक्रमही क्रेडाई-पुणे मेट्रोच्या माध्यमातून राबविले जातात, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
