मनुष्यबळ विकास क्षेत्रात मानसिकतेपासून तंत्रज्ञानापर्यंत पुनर्विचार आवश्यक – बाबा कल्याणी
पुणे:- झपाट्याने बदलत जाणारे तंत्रज्ञान आणि कौशल्यांचा वेध घेतला असता मनुष्यबळ क्षेत्रात तंत्रज्ञानापासून मनुष्यबळ नेतृत्वाच्या मानसीकतेत प्रचंड बदल करण्याची आवश्यकता आहे, असे मत ज्येष्ठ उद्योजक आणि भारत फोर्जचे संस्थापक पद्मभूषण बाबा कल्याणी यांनी व्यक्त केले.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंट या मनुष्यबळ व्यवस्थापकांच्या राष्ट्रीय स्तरावरील संघटनेतर्फे एशिया पॅसिफिक फेडरेशन ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘नॅटकॉन २०२३’ या ३९ व्या दोन दिवसीय राष्ट्रीय शिखर परिषदेचे उद्घाटन आज बाबा कल्याणी यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.
हॉटेल जे. डब्ल्यू मॅरिएट येथे आयोजित या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर देशाचे माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे, एनआयपीएमचे राष्ट्रीय अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी, ‘नॅटकॉन २०२३’ या राष्ट्रीय परिषदेचे निमंत्रक डाॅ. संतोष भावे, एनआयपीएम, पुणे चॅप्टरचे चेअरमन कल्याण पवार, एनआयपीएम- ‘नॅटकॉन २०२३’ च्या आयोजन समितीचे अध्यक्ष सदाशिव पाटील आणि एनआयपीएमचे महासचिव एम.एच. राजा आदी मान्यवर उपस्थित होते
यावेळी डाॅ. संतोष भावे आणि पी. प्रेमचंद यांना एनआयपीएम रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी ‘नॅटकॉन २०२३’ या राष्ट्रीय परिषदे निमित्त स्मरणिकेचे आणि संशोधन पुस्तिकेचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना बाबा कल्याणी म्हणाले की, आम्ही ज्या वेळी बाजारपेठेत उत्पादक म्हणून उतरलो त्यावेळी मनुष्यबळ आणि तंत्रज्ञान यांच्या गरजा वेगळ्या होत्या. आंतरराष्ट्रीय पातळीवरील बाजारपेठेत उतरतांनाचे स्पर्धक आणि स्पर्धा वेगळी होती. तंत्रज्ञान सहज उपलब्ध होत नव्हते. आता तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताने गरूड झेप घेतली असून चीनसारख्या स्पर्धकांच्या तुलनेत भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा विश्वास कमवला आहे. करोना काळात आपल्यासह जगाला चांगलाच धडा मिळाला असून प्रगतीचा आणि सेवा सुविधेचा वेग प्रचंड ठेवावा लागणार आहे. हा वेग आपण कायम ठेऊ शकलो तरच आपण आपले स्थान कायम ठेवू शकू. करोना काळात भारताच्या कामगीरीचा आलेख अभिमान वाटेल असाच उंचावत होता. पाश्चात देशांच्या तुलनेत भारत खूप चांगल्या सक्षम पद्धत्तीने महामारीला सामोरा गेला. तुरळक घटना सोडल्या तर ऑक्सिजन, पीपीपी किट, रुग्णालये, औषधांची उपलब्धता सर्व स्तरांवर आपण उल्लेखनीय कामगिरी केली. आजच्या डिजीटल युगात कौशल्याची व्याप्ती आणि व्याख्या बदललेली असून कौशल्ये केवळ उत्पादन घेण्यापुरते मर्यादित नाहीत. तंत्रज्ञानामुळे अनेक आव्हानांसह संधी देेेखील खुल्या झाल्या आहेत. कृषी आणि वैद्यकीय क्षेत्र हे याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. सुरूवातीपासून ‘मसल पावर’ आणि ‘ब्रेन पावर’ यात सुप्त संघर्ष राहिलेला आहे. ‘मसल पावर’पेक्षा ‘ब्रेन पावर’ वरचढ ठरण्यासाठी शिक्षण आणि प्रशिक्षणावर भर देऊन तरुणाची फौज निर्माण करावी लागणार आहे.
यावेळी बोलताना माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे म्हणाले की, सहृदयता, नि:स्वार्थी वृत्ती आणि निर्णय क्षमता ही नेतृत्वासाठी मुलभूत आवश्यक कौशल्ये आहेत. नेतृत्वाचे गुण जन्मत: असतात की नेतृत्व घडवले जाते याविषयी दुमत असू शकते, पण माझ्या मते नेतृत्वाला पैलू पाडले जातात. वैयक्तिक लाभ आणि फायद्यापेक्षा सार्वत्रिक हित लक्षात घेऊन काही प्रसंगी कटू निर्णय घेण्याची क्षमता नेतृत्वात असणे आवश्यक असते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एनआयपीएमचे राष्ट्रीय अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी यांनी केले. ‘नॅटकॉन २०२३’ या राष्ट्रीय परिषदेचे निमंत्रक डाॅ. संतोष भावे यांनी परिषद आयोजित करण्यामागील भूमिका विशद केली.
एनआयपीएम, पुणे चॅप्टरचे चेअरमन कल्याण पवार यांनी स्वागत केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वहिदा पठाण यांनी केले. एनआयपीएमचे महासचिव एम.एच. राजा यांनी आभार मानले.
