आजच्या स्पर्धेच्या काळात स्वतःशीच स्पर्धा असावी – कुलगुरु डॉ.सुरेश गोसावी
पुणे : आजची पिढी ही नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची साक्षीदार असेल. आजचा काळ हा स्पर्धेचा आहे. परंतु ही स्पर्धा स्वतःशीच असली पाहिजे. आपण स्वतःची प्रगती करतो तेव्हा राष्ट्राची देखील प्रगती होते. समाजाला काय आवश्यक आहे याचा विचार करायला हवा आणि त्या दृष्टीने समाजात आपले योगदान द्यायला हवे, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.सुरेश गोसावी यांनी व्यक्त केले.
जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटस्च्या वतीने ७ वा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळा न-हे येथील संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार संग्राम थोपटे, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष अॅड.शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. तर, खासदार हेमंत पाटील यांनी ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून संवाद साधला.
आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यांतर्गत आदर्श शिक्षण संस्थाचालक म्हणून सुर्यदत्ता ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटस्चे अध्यक्ष डॉ.संजय चोरडिया, आदर्श कुलगुरु म्हणून डी.वाय.पाटील विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.एन.जे.पवार, आदर्श प्राचार्य म्हणून एम.एस.काकडे कॉलेज सोमेश्वरनगरचे प्राचार्य डॉ.देविदास वायदंडे आणि बी.एम.सी.सी. कॉलेजेचे प्रा.डॉ.प्रशांत साठे यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. पुणेरी पगडी, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.
संग्राम थोपटे म्हणाले, उच्च तंत्र शिक्षण विभागाने वेगवेगळी माॅडेल्स तयार केली, परंतु त्याचा प्रचार आणि प्रसार फार ठिकाणी झाला नाही. आज अभिमत विद्यापीठाची संकल्पना आहे. त्यामध्ये प्रत्येक विद्यापीठ आपले अभिमत विद्यापीठ करण्याच्या मागे आहे. परंतु ज्यामध्ये चांगला दर्जा आहे, शिक्षणाची गुणवत्ता आहे अशीच विद्यापीठे भविष्यकाळात त्यांचा ठसा उमटवतील. पुण्यात शिक्षणाची चांगली दालने उभी झाली आहेत, याचा आनंद वाटतो असेही त्यांनी सांगितले.
डाॅ. एन.जे. पवार म्हणाले, ज्ञान, कौशल्य,वृत्ती,मूल्ये रुजविणे हा शिक्षणाचा मूळ हेतू असला पाहिजे, हे शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी देखील लक्षात ठेवायला पाहिजे. शिक्षणाच्या माध्यमातून हे कसे आत्मसात करता येईल, हे आपण ठरवायला पाहिजे. यापेक्षा वेगळे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात काही नाही. शिक्षण म्हणजे स्वतःला जाणून घेण्याची प्रक्रिया आहे, असेही त्यांनी सांगितले.
डाॅ. संजय चोरडिया म्हणाले, शेवटच्या क्षणापर्यंत शिकत राहिले पाहिजे आणि प्रगती करत राहिले पाहिजे. आपल्याला मिळालेले ज्ञान इतरांना देत राहिले पाहिजे, हीच खरी राष्ट्रभक्ती असेल. यावेळी चोरडिया यांनी प्रत्येकी १ लाख रुपयांच्या ३ शिष्यवृत्या जाहीर करीत जाधवर ग्रुपने त्यांचे वितरण करावे, असेही सांगितले.
डाॅ. प्रशांत साठे म्हणाले, आज कृत्रिम बुद्धीमत्तेचा काळ आहे. आपण सगळे त्याच्या आहारी गेलो आहोत. याचा समतोल साधण्यासाठी शिक्षणाची, राष्ट्रकारणाची आवश्यकता आहे. कृत्रिम बुद्धीमत्तेसोबतच वर्गामध्ये बसणे, शिकवणे आवश्यक आहे. विद्यापीठे गुणवत्तेची केंद्रे असली पाहिजेत. भारतीय ज्ञान परंपरा आपल्याला समजली पाहिजे. केवळ वेद,उपनिषदे आणि संस्कृत येणे म्हणजे भारतीय ज्ञान परंपरा नाही, तर स्वतःच्या विषयामध्ये भारताच्या दृष्टीने कसा विकास झाला याचे संपूर्ण ज्ञान पाहिजे. असेही त्यांनी सांगितले.