रूढ अर्थाने दिल्या जाणाऱ्या शिक्षणात कलांचा अंतर्भाव असावा – अभिनेते मोहन आगाशे
पुणे : जगण्यासाठी काहीतरी अर्थ पाहिजे तो अर्थ मिळविण्यासाठी रूढ अर्थाने दिल्या जाणाऱ्या शिक्षणात चित्रकला, छायाचित्रण, गायन, वादन अशा कलांचा अंतर्भाव असणे आवश्यक असल्याचे मत ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांनी व्यक्त केले.
प्राचार्य डॉ. जगदीश लांजेकर, पंडित रामदास पळसुले, डॉ. राजश्री गोखले, डॉ. अनघा काळे, नीतिका यांची प्रमुख उपस्थिती होती.
आपली संस्कृती वारसा परंपरा याचे महत्त्व आजच्या तरुण पिढीला पटवून देणे, त्याची जपणूक करणे, अभिमान निर्माण करणे आणि रूढी परंपरांकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवणे या उद्देशाने डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चौदाव्या ‘अस्तित्व’ या सांस्कृतिक स्पर्धेचे उद्घाटन करताना आगाशे बोलत होते.
आगाशे म्हणाले, सध्याच्या काळात शब्द हे कोणत्या ना कोणत्या स्वरूपात मोबाईल मध्ये कैद आहेत. आपण मोबाईलच्या माध्यमातून लिहू, बोलू, वाचू शकतो. चांगला वक्ता होण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. भारतीय संस्कृतीचे संवर्धन करणाऱ्या अस्तित्व सारख्या उपक्रमांचे महत्त्व आहे.