चंद्रकांत दांगट पाटील शिक्षण मंडळाच्या रॉयल रोझेस इंग्लिश मीडियम स्कूलवर कारवाईचा बडगा
पुणे : माजी नगरसेवक व संस्थेच्या कार्याध्यक्षांचे ‘चिरंजीव’ म्हणून पॉलिटेक्नीक डिप्लोमा विद्यार्थी इंग्रजी माध्यमाची शाळा मुख्याध्यापक म्हणून चालवीत असल्याचा धक्कादायक प्रकार सामाजिक कार्यकर्ते डॉ.अभिषेक हरिदास, अभिजीत खेडकर यांनी उघडकीस आणला होता. शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारी ही घटना शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात घडली. त्याविरोधात उभारलेल्या लढ्याला यश आले असून पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण खात्याने वडगाव बुद्रुक येथील रॉयल रोझेस इंग्लिश मीडियम स्कूल वर कारवाईचा बडगा उगारताना या शाळेची मान्यता रद्द करण्याची शिफारस केली आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभिषेक हरिदास यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कै. चंद्रकांत दांगट (पाटील) शिक्षण मंडळाच्या वतीने चालिवल्या जाणा-या वडगाव बुद्रुक येथील रॉयल रोझेस इंग्लिश मीडियम स्कूलच्या संचालक मंडळाचे कार्याध्यक्ष हे माजी नगरसेवक विकास दांगट पाटील आहेत. शाळेने सर्व शासकीय नियम गुंडाळून ठेऊन त्यांचा मुलगा चिरंजीव याची मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात आली. चिरंजीव दांगट हे शाळेचा सर्व कारभार पाहत आहेत. शाळेची अधिकृत वेबसाइट आणि सोशल मीडियावर स्पष्टपणे त्यांचा मुख्याध्यापक म्हणून उल्लेख करण्यात आला आहे.
मुख्याध्यापकासारख्या जबाबदारीच्या पदावर डिप्लोमाच्या विद्यार्थ्याच्या या बेकायदेशीर नियुक्ती विरोधात सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभिषेक हरिदास व अभिजीत खेडकर यांनी लेखी तक्रार नोंदवली होती. मात्र, पुणे महापालिका शिक्षण मंडळाने शाळा व्यवस्थापनावर कोणतीही कारवाई केली नव्हती. राज्य सरकारच्या नियमानुसार मुख्याध्यापक पदासाठीची शैक्षणिक पात्रता पदवी शिक्षण आणि बीएड अनिवार्य आहे. तरीही बेकायदेशीरपणे ही नियुक्ती करण्यात आलेली आहे.
डॉ. अभिषेक हरिदास म्हणाले, नुकतेच दिनांक २९ आॅगस्ट २०२३ रोजी पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने मान्यता रद्द करण्याचे पत्र दिले आहे. आता पुण्याच्या विभागीय शिक्षण उपसंचालकांनी यावर तत्काळ कारवाई करावी. राज्य शासनाच्या नियमानुसार डिप्लोमा हा बारावीच्या समकक्ष आहे. मात्र चिरंजीव दांगट हे डिप्लोमा धारक असून त्यांच्याच संस्थेच्या महाविद्यालयात एस.वाय. बीकॉम शिक्षण घेत आहेत. तरीही त्यांची वडगाव बुद्रुक येथील रॉयल रोझेस इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती झाली. आता जिल्हा परिषद, शिक्षण मंडळ आणि शिक्षण उपसंचालक कारवाई करणार असल्याने या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना इतर शाळांमध्ये वर्ग करावे. तसेच विकास दांगट पाटील हे राजकारणी असल्याने जाणीवपूर्वक हा विषय दाबण्याचा प्रयत्न होत असून त्वरित कारवाई होत नाही. तरी यावर त्वरित कारवाई व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
