यंदाचा शिवरामपंत दामले पुरस्कार क्रिकेटपटू चंदू बोर्डे यांना जाहीर
पुणे : महाराष्ट्रीय मंडळातर्फे क्रीडा, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना देण्यात येणारा कॅप्टन शिवरामपंत दामले पुरस्कार यंदा सुप्रसिद्ध क्रिकेटपटू चंदू बोर्डे यांना जाहीर करण्यात आला आहे.
येत्या रविवारी, दिनांक ३ सप्टेंबर रोजी सकाळी १०:३० वाजता, महाराष्ट्रीय मंडळाचे मुकुंदनगर येथील सकल ललित कलाघर येथे होणाऱ्या समारंभात जेष्ठ उद्योजक, प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक – अध्यक्ष व भारताचे इथॅनॉल मॅन अशी ओळख असेलेले डॉ. प्रमोद चौधरी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्रीय मंडळाचे सरकार्यवाह रोहन दामले यांनी दिली.
सदर पुरस्काराचे हे २६ वे वर्ष असून रुपये २५ हजार रोख, मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार, हिंदकेसरी गणपतराव आंदळकर, क्रीडा प्रशिक्षक गुरबंस कौर, भीष्मराज बाम, ग्रँड मास्टर अभिजित कुंटे हे या प्रतिष्ठित पुरस्काराचे या आधीचे मानकरी आहेत.