पिंपळे गुरवमधील रखडलेल्या कामांबाबत अजित पवार यांना निवेदन
पिंपरी : पिंपळे गुरवमधील रखडलेले सिमेंट रस्ते, ड्रेनेज लाईन, चिल्ड्रन प्लेग्राउंड आदी प्रलंबित विकासकामे तातडीने मार्गी लावावीत, यासाठी सामाजिक कार्यकर्ते तानाजी जवळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
उपमुख्यमंत्री पवार नुकतेच पिंपरी-चिंचवड शहराच्या दौऱ्यावर आले होते, त्यावेळी तानाजी जवळकर यांनी अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, सामाजिक कार्यकर्ते शाम जगताप, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, माजी नगरसेवक शिवाजी पाडुळे, राजू लोखंडे, विष्णू शेळके, सुरेश देवराज आदी उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे, की पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे अपेक्षित असलेली पिंपळे गुरव परिसरातील विकासकामे जैसे थे अवस्थेत आहेत. महापालिका अधिकारी, स्मार्ट सिटी अधिकारी, ठेकेदार यांच्याकडे वारंवार मागणी, तक्रार करूनही कामे मार्गी लागत नाहीत. त्यामुळे नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. जवळकर नगर ते कल्पतरू फेज एक दरम्यान चाळीस फुटी सिमेंट रस्ता, कृष्ण मंदिर गल्ली क्रमांक १ व २ येथील ड्रेनेज लाईन व रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण, सिंहगड कॉलनी व ऋतुराज कॉलनी जवळकरनगर मधील ड्रेनेज लाईन व रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण आदी रखडलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तर कै. बट्टूराव जगताप उद्यानात सुविधांचा अभाव असल्याने त्याचा लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना वापर करता येत नाही. त्यामुळे इथे सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे.