fbpx
Monday, October 2, 2023
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

पूर्वीचे ऐतिहासिक कोल्हापूर पुन्हा एकदा उभं राहिल – पालकमंत्री दीपक केसरकर

कोल्हापूर : जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तू, मंदिरे, सामाजिक विषयाशी निगडीत जुन्या वास्तू व ठिकाणांची शासनस्तरावरुन विविध कामांतून दुरुस्ती, डागडूजी सुरु आहे. पुर्वीच्या आहे त्या स्थितीत कोणताही आधुनिकपणा न आणता जुन्या पध्दतीने ऐतिहासिक वारसा असलेलं, छत्रपती शाहू महाराजांच्या दूरदृष्टीतून निर्माण झालेलं कोल्हापूर पून्हा एकदा त्याच प्रकारे येत्या काळात उभं करणार असल्याचे आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी कोल्हापूर येथे केले.

मंदिर परिसरातील भवानी मंडप येथील हुजूर पागा इमारत येथे उभारण्यात आलेले स्वच्छतागृह व दक्षिण दरवाजा नजिक वाहनतळ परिसरात उभारण्यात आलेल्या चप्पल स्टॅन्ड सुविधा केंद्राचे उद्घाटन केल्यानंतर माध्यमांशी बोलत होते. यावेळी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांची प्रमुख उपस्थिती होती. सोबत खासदार संजय मंडलिक, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

जिल्हा वार्षिक योजनेतून पर्यटनस्थळ विकास कार्यक्रमांतर्गत भवानी मंडप जवळ हुजूर पागा येथील स्वच्छतागृह 83 लाख 8 हजार रुपयांच्या निधीतून तर दक्षिण दरवाजा येथील चप्पल स्टॅण्ड सुविधा केंद्र 11 लाख 78 हजार रुपयांच्या निधीतून उभारण्यात आले आहे.

गर्दीचे दिवस वगळून मंगळवार पासून भाविकांना गाभाऱ्यातून श्री महालक्ष्मी अंबाबाईचे दर्शन घेता येणार असल्याचे सांगून पालकमंत्री श्री. केसरकर म्हणाले, मंदिर परिसरातील कामांची ही फक्त सुरुवात असून येत्या काळात भूमिगत पद्धतीने विद्यूत वाहिन्या तसेच दर्शन रांगा व वाहनतळही जमिनीखालून केले जाणार आहे. मंदिर परिसरातील माहिती केंद्र पागा इमारतीत हलविले जाणार आहे. श्रीमंत शाहू महाराजांच्या सूचना घेवून पुरातत्व विभागाच्या संमतीने कामे केली जात असून पुर्वीचा मंदिर परिसर उभा केला जाणार आहे. पागा इमारतीमध्ये सुविधा निर्माण करत असताना आंतरराष्ट्रीय दर्जाचे वास्तुविशारद घेतले आहेत. मंदिर परिसरात कामांची गती संथ असण्याचे कारण गुणवत्ता व तज्ज्ञ व्यक्तींची मदत हे आहे. सर्व कामे चांगली व्हावीत, यासाठी आम्ही प्रयत्न करत असून येत्या काळात कोल्हापूरला निश्चितच चांगली झळाळी प्राप्त होईल, असे ते पुढे म्हणाले.

यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, खासदार संजय मंडलिक, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील आदी मान्यवरांनी सोबत श्री महालक्ष्मी, अतिबलेश्वर, छत्रपती शाहू महाराज राजमहालातील श्री तुळजाभवानीचे दर्शन घेवून मंदिर परिसर व भवानी मंडपाची पाहणी केली.

Leave a Reply

%d bloggers like this: