परभणीतही विकासाची गंगा आणू-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
परभणी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश पुढे जात असून महाराष्ट्रात महायुती सरकारच्या माध्यमातून ‘शासन आपल्या दारी’ या क्रांतिकारी अभियानाच्या माध्यमातून लोकाभिमुख व सर्वसामान्यांच्या हिताचा कार्यक्रम राबविला जात आहे. परभणीला काँक्रीट रस्त्यांसाठी आवश्यक निधी देवून जिल्ह्यात विकासाची गंगा आणू, असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापिठातील ग्रीष्म (दगडी) वसतिगृहासमोरील क्रीडा संकुलाच्या मैदानावर आयोजित मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते रविवारी (दि. 27) दुपारी ‘शासन आपल्या दारी’ या जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, आमदार सुरेश वरपूडकर, आ.बाबाजानी दुर्राणी, डॉ.रत्नाकर गुट्टे, आ.मेघना बोर्डीकर, आ.विक्रम काळे, आ.विप्लव बाजोरिया, आ.बालाजी कल्याणकर, कृषी आयुक्त सुनिल चव्हाण, विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा परिषदेचे सीईओ विनय मून, वनामकृविचे कुलगुरू डॉ.इंद्र मणी, पोलीस अधीक्षक रागसुधा आर., मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर, मुख्यमंत्री कार्यालयातील खाजगी सचिव डॉ.अमोल शिंदे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, माजी खासदार सुरेश जाधव, गणेश दुधगावकर यांच्यासह माजी आ.माणिकराव आंबेगावकर, मोहन फड, हरिभाउ लहाने, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, राजेश देशमुख, आनंद भरोसे, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव शिंदे, महानगराध्यक्ष प्रवीण देशमुख, राजेश विटेकर, प्रताप देशमुख, भावना नखाते आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी स्वातंत्र्यसैनिक शिवाजीराव डावरे व दिवंगत स्वातंत्र्यसैनिक गणपतराव रेंगे यांच्या पत्नी गयाबाई रेंगे यांचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. तसेच विविध योजनांच्या 20 लाभार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात लाभ देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले. सुत्रसंचालन आकाशवाणीच्या निवेदिका सौ.सिमंतिनी कुंडीकर यांनी केले.