डॉ. माधव गाडगीळांच्या आत्मचरित्राचे ९ भाषांमधील अनुवादक आणि प्रकाशक येणार एकत्र
पुणे: मूळ इंग्रजी भाषेत असलेल्या ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचे ‘ए वॉक अप द लिव्हिंग विथ पिपल अँड नेचर’ आत्मचरित्र आता एकाचवेळी ९ भाषांमध्ये प्रकाशित होणार आहे. सह्याचला: एक प्रेम कहाणी असे नामकरण केलेल्या या आत्मचरित्रात त्यांनी सह्याद्री पर्वतालाच आपल्या कहाणीचा विषय केले आहे. एकाचवेळी ९ भाषांमध्ये या आत्मचरित्राचे प्रकाशन होत असतानाच त्यापूर्वी या सर्व अनुवादक आणि प्रकाशकांना एकत्र आणण्याचे काम “वनराई” संस्थेतर्फे करण्यात आले आहे. पर्वती येथील मित्र मंडळ चौकातील वनराईच्या कार्यालयात गुरुवार दिनांक ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४:३० वा. माधव गाङगीळ यांच्या उपस्थितीत या अनुवादकांचे स्नेहमिलन होणार असल्याची माहिती वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया यांनी दिली.
धारिया म्हणाले की, डॉ. माधव गाडगीळांचे निसर्गाप्रतीचे काम सर्वश्रुत आहे. त्यामुळे विविध राज्यामधील पर्यावरणप्रेमींनी पुढाकार घेत त्यांच्या भाषेत डॉ. गाडगीळांचे आत्मचरित्र प्रकाशित करण्याची इच्छा व्यक्त केली होती. यानिमित्ताने डॉ. गाङगीळ यांच्या जीवनप्रवासाची माहिती तळागाळातील स्थानिक, सर्वसामान्य नागरिक व पर्यावरणप्रेमी यांच्यासाठी साध्यासोप्या मातृभाषेत उपलब्ध होणार आहे. या स्नेहमिलनाच्या निमित्ताने हे सर्व अनुवादक आणि प्रकाशक आपापले अनुभव कथन करणार आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्वतः डॉ. गाडगीळ असून ते यावेळी उपस्थितांशी संवाद साधणार आहेत.
गाडगीळांनी हे आत्मचरित्र स्वत: इंग्रजीत लिहीले असून ‘ए वॉक अप द लिव्हिंग विथ पिपल अँड नेचर’ असे त्याचे नाव आहे. त्याचे मराठीत भाषांतरही त्यांनी स्वत:च केले असून त्याचे नाव सह्याचला: एक प्रेम कहाणी असे आहे. त्याशिवाय कोंकणी, कानडी, मल्याळम, तमिळ, तेलगू, हिंदी व बंगाली या भाषांमध्येही त्याचे अनुवाद झाले आहेत. या सर्व पुस्तकांचे एकाच वेळी प्रकाशन होणार आहे. आत्मचरित्र तेही इंग्रजीतून मराठीत व त्याचा अन्य ७ भारतीय भाषांमध्ये अनुवाद असा आत्मचरित्र या साहित्यप्रकारातील एक प्रकारचा विक्रमच असेल.
वनराईतर्फे याआधी गाडगीळ समितीच्या अहवालाशी निगडित तथ्य, तज्ज्ञ समितीचा दृष्टिकोन, भूमिका, निष्कर्ष, सूचना आणि शिफारशी इत्यादी बाबींची माहिती सर्वसामान्यांना साध्यासोप्या मराठी भाषेत उपलब्ध व्हावी, तसेच या विषयाबाबत विविध स्तरावर असलेले समज-गैरसमज दूर होऊन जननागृती व्हावी या हेतूने डॉ. माधव गाडगीळ लिखित ‘सह्याद्रीची आर्त हाक : पश्चिम घाट समिती अहवालाचा मथितार्थ’ हे पुस्तक ‘वनराई’च्या वतीने प्रकशित करण्यात आले होते.