मेट्रो स्टेशनमध्ये ‘नाच गं घुमा’चा फेर!
पुणे : मेट्रोच्या चकचकीत अत्याधुनिक प्लॅटफॉर्मवर पारंपरिक श्रावण खेळ व्हावे, एरवी लॅपटॉप, सॅक, फाईल घेऊन एस्कलेटरवरून पळापळ करणाऱ्या कार्पोरेट प्रवाशांच्या जागी नथ घालून, गजरे माळून, नऊवारी नेसून महिलांनी वावरावं… असे चित्र पहायला मिळाले ते मेट्रो प्लॅटफॉर्मवर.
पारंपरिक गीते, संगीतासह नृत्याविष्काराने शिवाजीनगरचे मेट्रो स्टेशन अधिकच लक्षवेधी ठरले. नित्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या निमित्ताने वेगळा आनंद लुटता आला. निमित्त होते श्रावण सखी महोत्सवाचे. ऑल आर्टिस्ट फाउंडेशन व कनि महिला मंचतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या हस्ते नटराज पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. राष्ट्रवादी महिला आघाडीच्या उपाध्यक्ष अर्चना चंदनशिवे, कनि महिला मंचच्या अध्यक्षा कल्याणी कदम, उल्हास कदम, ऑल आर्टिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश सुपेकर, उपाध्यक्ष पप्पू बंड प्रामुख्याने उपस्थित होते. ‘महिलांचे जीवन कायमच मेट्रोच्या वेगाशी स्पर्धा करणारे असते; पण नेमका ‘प्लॅटफॉर्म‘ तिला मिळत नाही. हवे ते स्टेशन गाठण्यासाठी तिची कायम धडपड चालली असते. कनि महिला मंचने नेमकी हीच बाब हेरून मेट्रो स्टेशनचा प्लॅटफॉर्म निवडला असल्याचे कल्याणी कदम यांनी याव्ोळी स्पष्ट केले. श्रावण मेळ्याच्या आयोजनाची भूमिका स्पष्ट करताना त्या पुढे म्हणाल्या की, ‘ग्रामीण भागासह शहरातील कित्येक ठिकाणच्या महिलांनी मेट्रो विषयी फक्त ऐकले आहे, त्यांना ती सफर घडविण्यासाठी श्रावणमेळ्याहून उत्तम संधी काय असावी? म्हणूनच हे दोन्ही प्लॅटफॉर्म एकत्र येणे हा दुग्धशर्करा योग म्हणता येईल. या उपक्रमाला सहकार्य केल्याबद्दल मेट्रोचे अधिकारी मनोज डॅनियल यांचे विशेष आभारही कल्याणी कदम यांनी मानले.
कार्यक्रमाला पारंपरिक वेशभूषेत उपस्थित असलेल्या महिलांनी उत्स्फूर्त दाद दिली. मंगळागौरीचे खेळ, पारंपरिक गीते, मराठी चित्रपट गीते, हिंदी गाण्यांनी वेगळी रंगत आणली. दिप्ती कुलकर्णी यांनी पियानिकावर ‘आली उमलून माझ्या दारी‘ वाजवताच संगीताच्या तालावर महिलांनी फुगडीचा फेर धरला. गणेश मोरे, अनिल गोंदकर, शिल्पा देवरुखकर, स्नेहल आपटे, कविता जवळेकर आदींनी गायलेल्या गाण्यांवर महिला थिरकल्या.
मेट्रोच्या उद्घेोषणेसह सुरू असलेल्या या कार्यक्रमात प्रवाशांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शविला. सूत्रसंचालन योगेश सुपेकर आणि संदीप पाटील यांनी केले. ‘नाच गं घुमा, कशी मी नाचू‘ म्हणत सुरू झालेला हा प्रवास ‘पिंगा ग पोरी पिंगा‘पर्यंत कधी येऊन ठेपला हे समजलेच नाही. संपूर्ण कार्यक्रमादरम्यान मेट्रोची सफर हे विशेष आकर्षण होते.