fbpx
Thursday, December 7, 2023
ENTERTAINMENTLatest NewsMAHARASHTRATOP NEWS

ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन

मुंबई: मराठी आणि हिंंदी मनोरंजन विश्वात आपल्या  अभिनयाचा अमिट ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन झाले. त्या ८१ व्या वर्षांच्या होत्या. सीमा देव यांनी मराठी आणि हिंदी सिनेमात उल्लेखनीय काम करत नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यांनी जवळपास ८० हिंदी आणि मराठी सिनेमांमध्ये काम केले होते. मिळालेल्या माहितीनुसार दोन वर्षांपूर्वी त्यांना अल्झायमर या आजाराचेही निदान झाले होते. गेल्या काही काळापासून सीम त्यांचा मुलगा, दिग्दर्शक अभिनव देव यांच्यासोबत मुंबईतील वांद्रे येथे  राहत होत्या. 

सीमा देव यांचा जन्म २७ मार्च १९४२ रोजी मुंबई येथे झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव नलिनी सराफ होते. त्यांचे बालपण मुंबई येथील गिरगाव परिसरात गेले. तेथेच राममोहन इंग्लिश स्कूलमधून त्यांनी इयत्ता ९वीपर्यंतचे शिक्षण घेतले. ‘झनक झनक पायल बाजे’ या चित्रपटातून समूहनृत्यामध्ये नृत्य करणार्या नलिनी सराफ यांनी कुटुंबाचा आर्थिक भार उचलण्यासाठी चित्रपटांमध्ये प्रवेश केला. भावंडांची जबाबदारी, डोक्यावर वडिलांचे छत्र नाही, अशा स्थितीत एकट्या कमावणार्या आपल्या आईला सुचिताला मदत करायची, या हेतूने चित्रपटात मिळेल ते काम स्वीकारण्याची त्यांची तयारी होती. चित्रपटात भूमिका साकारताना लहानपणापासून शिकलेल्या नृत्याची त्यांना मदत झाली. ‘आलिया भोगासी’ हा नलिनी सराफ यांचा पहिला चित्रपट. यात त्यांचे सहकलावंत होते रमेश देव. रमेश देव यांच्या बहिणीची भूमिका त्यांनी साकारली. १९६५ साली ‘पडछाया’ या चित्रपटात रमेश देव यांच्या मुलीची भूमिका त्यांनी केली. चित्रपट क्षेत्रात ‘नलिनी’ नावाच्या अन्य अभिनेत्रीही असल्याने नलिनी सराफ यांनी आपले मूळ नाव सोडून ‘सीमा’ हे नाव धारण केले.

सीमा यांनी रमेश देव यांची नायिका म्हणून सर्वप्रथम ‘ग्यानबा तुकाराम’ (१९५८) या चित्रपटात काम केले. त्यानंतर ‘यंदा कर्तव्य आहे’, ‘माझी आई’, ‘सुवासिनी’, ‘सोनियाची पावले’, ‘मोलकरीण’ यांसारख्या अनेक चित्रपटांत रमेश देव यांच्यासह भूमिका साकारल्या. एक अभिनेत्री म्हणून सीमा यांच्या रुपेरी जीवनाला आकार देणारा महत्त्वाचा पहिला चित्रपट म्हणजे ‘जगाच्या पाठीवर’. १९६० सालच्या या चित्रपटात त्यांनी साकारलेल्या आंधळ्या नायिकेच्या भूमिकेचे कौतुक झाले. एक सशक्त अभिनेत्री म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. ही भूमिका साकारताना त्यांनी अपार मेहनत घेतली. राजा परांजपेंसारख्या कुशल अभिनेता-दिग्दर्शकामुळे सीमा यांना ही भूमिका सहजरीत्या सादर करण्यात यश आले. सीमा यांच्यावर चित्रित झालेल्या ‘तुला पाहते रे तुला पाहते’ या गाण्यासह यातील सर्वच गाणी आजही श्रवणीय आहेत.

‘सुवासिनी’, ‘हा माझा मार्ग एकला’, ‘पाहू रे किती वाट’, ‘अपराध’, ‘या सुखांनो या’ या चित्रपटांतील सीमा यांच्या भूमिका गाजल्या. १९६३ सालच्या ‘पाहू रे किती वाट’ या चित्रपटातील भूमिकेसाठी महाराष्ट्र सरकारचा सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार सीमा यांना मिळाला. सोज्ज्वळ चेहरा असूनही ‘अपराध’, ‘मोलकरीण’ अशा चित्रपटांतून वाईट प्रवृत्तीच्या व्यक्तिरेखाही त्यांनी तेवढ्याच समरसतेने साकारल्या.

रमेश देव यांच्याबरोबर प्रेमविवाह झाल्यानंतर सीमा यांनी संसारातच स्वत:ला गुंतवून घेतले. पुढे आई म्हणून आपली कर्तव्ये पार पाडत असताना, मुले मोठी झाल्यावर चरित्र अभिनेत्री म्हणून त्यांनी चित्रपटांमधून भूमिका करण्यास पुन्हा सुरुवात केली. ‘सर्जा’ या घरची निर्मिती असलेल्या चित्रपटात अजिंक्य देवच्या आईची भूमिका त्यांनी साकारली. अजिंक्य आणि अभिनय या दोन्ही मुलांना घडविण्यासाठी आणि त्यांच्यावर चांगले संस्कार करण्यासाठी सीमा यांनी कामे सांभाळून त्यांच्याकडे विशेष लक्ष दिले.

चरित्र अभिनेत्री म्हणून सीमा यांना हिंदी चित्रपटात अनेक नामवंत कलाकारांसह काम करण्याची संधी मिळाली. मीनाकुमारी, अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, अनिल कपूर, गोविंदा यांसारख्या सर्व पिढीतील कलावंतांसह काम करताना आपल्या भूमिकेशी त्या प्रामाणिक राहिल्या. ‘भाभी की चूडियॉं’, ‘आँचल’, ‘आनंद’, ‘प्रेमपत्र’, ‘मियॉं बीबी राजी’, ‘तकदीर’, ‘हथकडी’, ‘मर्द’ हे सीमा यांचे यशस्वी हिंदी चित्रपट.

सीमा देव यांनी याशिवाय ‘आलिया भोगासी’, ‘दोन घडीचा डाव’, ‘राजमान्य राजश्री’, ‘अंतरीचा दिवा’, ‘जगाच्या पाठीवर’, ‘पैशांचा पाऊस’, ‘आधी कळस मग पाया’, ‘प्रपंच’, ‘सुवासिनी’, ‘चिमण्यांची शाळा’, ‘रंगल्या रात्री अशा’, ‘हा माझा मार्ग एकला’, ‘मोलकरीण’, ‘पाहू रे किती वाट’, ‘पडछाया’, ‘सुखी संसार’, ‘अपराध’, ‘नंदिनी’, ‘काळी बायको’, ‘या सुखांनो या’, ‘जानकी’, ‘पोरींची धमाल बापाची कमाल’, ‘सर्जा’, ‘जिवा सखा’, ‘कुंकू’ या महत्त्वाच्या मराठी चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत.

Leave a Reply

%d