हा चित्रपट बनवू नको असा अनेकांनी सल्ला दिला होता – दिग्दर्शक सलील कुलकर्णी
‘एकदा काय झालं’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर
पुणे : 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची आज घोषणा झाली. यामध्ये प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक सलील कुलकर्णी दिग्दर्शित ‘एकदा काय झालं’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला. दिग्दर्शक म्हणून सलील कुलकर्णी यांचा हा दूसरा चित्रपट. कुटूंबयात अचानक आलेल्या कठीण परिस्थितीला सामान्य माणस कशी सामोरी जातात. यावेळी त्यांच्याकडे शिदोरी असते ती आपल्या आजी-आजोबांनी किंवा आई-बाबांनी लहानपणी सांगितलेल्या गोष्टींची. या गोष्टींतून आपल्यावर जे संस्कार झालेले असतात, तेच शेवटी आपल्याला कठीण काळात बळ देतात. अशी या चित्रपटाची कथा आहे. अशा संवेदनशील चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्याने सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
याविषयी आपल्या भावना व्यक्त करताना दिग्दर्शक सलील कुलकर्णी म्हणाले, हा चित्रपट तयार करताना संवेदनशील विषयावर चित्रपट तयार करणे हे आजच्या काळात धोक्याचे आहे असे इशारे मला अनेकांनी दिले होते. पण मी ऐकले नाही. इतकं हळवं, नाजूक कोण पहातं, असा अनेकांचा समज होता. मात्र एक संवेदनशील चित्रपट कुठवर पोहोचू शकतो हे या चित्रपटाने दाखवून दिले. कुटुंबातील प्रत्येक नाते अधोरेखित करणारा हा चित्रपट असून आज त्याचा राष्ट्रीय पुरस्काराने होत असलेला सन्मान मला शब्दांत वर्णन करता येत नाहीये. मी कविता लिहिल्या, गाणी लिहिली, चित्रपट केला मी आजवर जे जे केलं त्याला जगभरातील रसिक प्रेक्षकांनी केवळ प्रेम दिले यासाठी मी त्यांना कायम ऋणी आहे.
निर्माते सौमेंदु कुबेर म्हणाले, हा विषय हाताळताना एक जबाबदारीची भावना आमच्या मनात होती. आज जाहीर झालेला राष्ट्रीय पुरस्कार हा आम्हाला बळ देणारा आहेच, शिवाय जबाबदारी वाढवणारा देखील आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा हा विषय चर्चिला जाईल याचा आनंद आहेच. चित्रपटाचे दिग्दर्शक डॉ. सलील कुलकर्णी, कलाकार सुमीत राघवन, उर्मिला कानेटकर, डॉ. मोहन आगाशे, सुहास जोशी, पुष्कर श्रोत्री, अर्जुन पूर्णपात्रे आणि निर्माते सलील कुलकर्णी, सौमील श्रुंगारपुरे, सिद्धार्थ महादेवन, सिद्धार्थ खिंवसरा, अनुप निमकर, अरुंधती दात्ये, पूर्वा कुबेर आणि नितीन वैद्य यांचेही मी आभार मानतो.