Saturday, May 9, 2026
Latest NewsPUNE

बाबासाहेब पुरंदरे यांना जन्मदिनानिमित्त ‘जन्मस्थान मानवंदना’

पुणे : इतिहासाच्या माध्यमातून देशभक्तीची जागृती करणा-या पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना १०१ व्या जन्मदिनानिमित्त पुणेकरांनी जन्मस्थान मानवंदना दिली. शुक्रवार पेठेतील शिर्केवाडा येथे २९ जुलै १९२२ रोजी नागपंचमीच्या दिवशी बाबासाहेबांचा जन्म झाला होता. याठिकाणी हा कार्यक्रम घेण्यात आल्याने त्याला विशेष महत्व होते.

इतिहास प्रेमी मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याजवळील शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळाच्या जवळ आयोजित कार्यक्रमात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या १०१ व्या जन्मदिनानिमित्त ही मानवंदना देण्यात आली. यावेळी इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे यांनी उपस्थितांना या स्थानाचे महत्व आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्या कार्याची महती सांगितली. कार्यक्रमाला क्रांतीवीर उमाजी नाईक समितीचे सुनील जाधव व इतिहासाचे प्राध्यापक गणेश राऊत उपस्थित होते.

मोहन शेटे म्हणाले, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी सन १९५२ रोजी या वाडयातील वास्तव्य सोडले. त्यानंतर शिवचरित्राच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाला जणू त्यांनी मिठीच मारली. महाराष्ट्राचा इतिहास आणि शिवचरित्र घराघरात पोहोचावे, याकरिता बाबासाहेबांनी अथक प्रयत्न केले.

ते पुढे म्हणाले, बाबासाहेब शालेय वयात असताना उत्तम नकला करायचे. स्वा.सावरकरांसमोर त्यांनी त्यांचीच नक्कल करून दाखवली होती. प्रेरणादायी शिवचरित्र आकर्षक रीतीने मांडण्यासाठी त्यांनी अवघे जीवन समर्पित केले होते. इतिहासाच्या माध्यमातून त्यांनी देशभक्तीची जागृती केली. त्यांचा हा संदेश आपण सर्वांनी पुढे न्यायला हवा.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading