Wednesday, June 10, 2026
Latest NewsPUNE

सतर्क राहण्याचा संस्कार लहान वयातच मुलांमध्ये रुजवा निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले यांचे मत

पुणे : देश आपल्यासाठी काय करतो, सरकार आपल्यासाठी काय करते, यापेक्षा आपण देशासाठी काय करतो हे जास्त महत्वाचे आहे. आज प्रत्येक नागरिकाने सतर्क राहणे गरजेचे आहे. पुण्यासारखे शहर देखील आता असुरक्षित होत आहे. देशासाठी जागृत राहण्याचा संस्कार लहानपणापासून मुलांमध्ये रुजला पाहिजे म्हणजे जर्मन बेकरी सारखे हल्ले होणार नाहीत, असे मत निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले यांनी व्यक्त केले.

गुरूवार पेठेतील प्रभात जन प्रतिष्ठान च्यावतीने प्रभात शौर्य पुरस्कार अर्पण सोहळ्याचे श्री मुरलीधर मंदिर देवालय ट्रस्ट येथे आयोजन करण्यात आले. यावेळी सातारा जिल्ह्यातील हुतात्मा जवान प्रथमेश संजय पवार यांना हा पुरस्कार अर्पण करण्यात आला. त्यांचे वडील संजय पवार यांनी हा पुरस्कार स्वीकारला. कार्यक्रमाला माजी सहायक पोलिस आयुक्त भानुप्रताप बर्गे, प्रभात जन प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोर चव्हाण, अविनाश निरगुडे, संदीप नकील, रवींद्र भन्साळी, हेमराज साळुंखे, अमोल थोरात आदी उपस्थित होते. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल श्रीफळ व एकवीस हजार रुपयांचा धनादेश असे पुरस्काराचे स्वरूप होते.

भानुप्रताप बर्गे म्हणाले, मी श्रीराम आणि श्रीकृष्ण हा परमेश्वर पाहिला नाही. पण मी तीव्र थंडीत आणि अतिशय कडक उन्हात देशाचे संरक्षण करणारा परमेश्वर पाहिला आहे. संस्कृती आणि सभ्यता ही अनेक वर्षांपासून आपल्या भूमीत आहे. परंतु आज आपण स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातील फरक विसरत आहोत. साधा रस्त्यावरील सिग्नल देखील आपण पाळत नाही. आपण जे काम करू ते प्रामाणिकपणे आणि मनापासून देशासाठी करू, असेही त्यांनी सांगितले.

किशोर चव्हाण म्हणाले, सैनिकांच्या शौर्याचे कौतुक ते जिवंत असताना करावे, अशी इच्छा असते. त्यांचे शौर्य जनमानसात सर्वांना कळावे, त्याबरोबर त्यांच्या आई वडिलांची आठवण ठेवून त्यांचा सन्मान करावा. हुतात्मा कोणी होऊ नये. पण झालेच तर त्यांचे स्मरण रहावे हा हेतू समोर ठेऊन मंडळाच्या या पुरस्काराचे आयोजन केले जाते. यावेळी पुरस्काराला उत्तर देत संजय पवार यांनी मुलाच्या आठवणी आणि त्याची शौर्यगाथा सांगितली. निलेश कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. ओंकार नाईक यांनी आभार मानले.

फोटो ओळ : गुरूवार पेठेतील प्रभात जन प्रतिष्ठान च्यावतीने प्रभात शौर्य पुरस्कार अर्पण सोहळ्याचे श्री मुरलीधर मंदिर देवालय ट्रस्ट येथे आयोजन करण्यात आले. यावेळी सातारा जिल्ह्यातील हुतात्मा जवान प्रथमेश संजय पवार यांना हा पुरस्कार अर्पण करण्यात आला. पुरस्कार स्विकारताना त्यांचे वडील संजय पवार, भाऊ आदित्य पवार आणि प्रतिष्ठानचे पदाधिकारी.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading