मेधा कुलकर्णी यांच्या पोस्टरवर कोथरुड भाजपमधून नाराजी
पुणे : भाजपा महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा मेधा कुलकर्णी यांच्या चांदणी चौक लोकार्पण कार्यक्रमावरुन कोथरुड भाजपामध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मेधा कुलकर्णी पक्षाची शिस्त मोडत असल्याची चर्चा कोथरुडमधील कार्यकर्त्यांमध्ये सुरु असून, भाजपा कोथरुड अध्यक्ष पुनीत जोशी यांनी व्हिडिओ प्रसारित करुन मेधा कुलकर्णींचे सर्व दावे फेटाळून लावले आहेत.
पश्चिम पुण्याचे प्रवेशद्वार असलेल्या चांदणी चौकाचे १२ ऑगस्ट रोजी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व अजितदादा पवार यांच्या हस्ते लोकार्पण झाले. मात्र, या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला कोथरुडच्या माजी आमदार मेधाताई कुलकर्णी यांनी फेसबुक पोस्ट लिहून चांदणी चौकाच्या उद्घाटन कार्यक्रमावरुन पक्षालाच घेण्याचा प्रयत्न केला.
मेधा कुलकर्णी यांच्या फेसबुक पोस्ट वरुन आता कोथरुड भाजपच्या कार्यकर्त्यांकडून नाराजी व्यक्त केली जात असून, पक्ष शिस्त सातत्याने मोडत असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरु आहे. या संदर्भात भाजपा कोथरुड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी यांनी व्हिडिओ प्रसारित केला असून, मेधा कुलकर्णी यांचे सर्व दावे फेटाळून लावले आहेत.
पुनीत जोशी यांनी आपल्या व्हिडिओ मधून म्हटलं आहे की, “पुणेकरांसाठी बहुप्रतिक्षित असलेल्या चांदणी चौकातील पुलाचे उद्घाटन देशाचे वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते १२ ऑगस्ट रोजी पार पडले. पण या ऐतिहासिक सोहळ्याबद्दल माजी आमदारांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. साधे हँडबिलवर फोटो नाही हा त्यांचा आक्षेप होता पण याच वेळी शहरात २४० हॉर्डिंग्स वर यांचे फोटो होते, वृत्तपत्रातील जाहिरातीत यांचे फोटो होते.
साधारण नाराजी असेल तर ती अशी जाहीर व्यक्त करायची नसते, ही पक्षाने आम्हाला दिलेली शिकवण आहे. पक्ष आधी नंतर आपण हे आपल्या पक्षाचे विचार आहेत. ऐन कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी तुम्ही असे व्यक्त होणे एक कार्यकर्ता म्हणून माझ्या मनाला पटले नाही म्हणून हा व्हिडीओ पोस्ट करतोय, अशी भावना पुनीत जोशी यांनी व्यक्त केली आहे.
https://fb.watch/mnaXXSXmxQ/?mibextid=2Rb1fB
