मेट्रोच्या कामांना गती देणार-उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे : चांदणी चौकातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. केंद्र सरकारच्या सहकार्यामुळे ही समस्या दूर करण्यात यश आले. भूसंपादनासाठी जिल्हा प्रशासनानेही चांगले प्रयत्न केले. राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण, पोलीस आणि नागरिकांचेही सहकार्य लाभले. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील मेट्रोच्या कामालाही गती देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. वनाज ते चांदणी चौक आणि वाघोलीपर्यंतही मेट्रो कमीत कमी कालावधीत पोहोचवायची आहे.असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
पुणे शहरात एनडीए चौकातील (चांदणी चौक) राष्ट्रीय महामार्ग क्र.४८ वरील एकात्मिक पायाभूत सुविधा आणि रस्ते विकास प्रकल्प तसेच खेड व मंचर रस्ता चौपदरीकरणाच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते.
पुणे शहराला जोडणाऱ्या रस्त्यांवर उड्डाणपूल उभारण्यासाठी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी शहरातील पूल बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविल्याने पुणे शहराला त्याचा लाभ होणार आहे. पुणे परिसरात मोठ्या प्रमाणात उद्योग येत असल्याने रस्ते, मेट्रो, विमान वाहतूक अधिक सक्षम करणे आवश्यक आहे आणि त्यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. पुणे अंतर्गत चक्राकार मार्गाची जबाबदारी केंद्र सरकारने घ्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. राज्य शासन आणि पुणेकर यासाठी सर्व सहकार्य करतील असेही श्री.पवार म्हणाले
एनडीए चौकतील प्रकल्पामुळे वाहतूक कोडी दूर होण्यास मदत-पालकमंत्री
पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, एनडीए चौकातील एकात्मिक सुविधा प्रकल्प मुंबईहून बंगळुरूकडे जाणाऱ्या प्रवाशांना उपयुक्त ठरण्यासोबत शहरातील वाहतूक कोंडी दूर होण्यास उपयुक्त ठरणार आहे. शहरात मेट्रोचा दुसरा टप्पा सुरू झाला असून त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे. मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सकाळी ६ पासून मेट्रोची फेरी सुरू केल्यास सकाळी रेल्वेने जाणाऱ्या प्रवाशांना फायदा होईल. राज्यात १८ हजार किलोमीटर लांबीचे महामार्ग झाले आहेत , असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्राच्या विकासात रस्त्यांची भूमिका महत्वाची-डॉ.नीलम गोऱ्हे
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.गोऱ्हे म्हणाल्या, रस्ते बांधणीच्या माध्यमातून देशाची बांधणी होत आहे. विशेषतः दुर्गम भागात विविध सुविधा पोहोचविण्यासाठी रस्ते उपयुक्त ठरतात. अशा रस्त्यांमुळे जागतिक पातळीवर देशाची प्रतिमा उंचावत आहे. महाराष्ट्राच्या विकासातही रस्त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. एनडीए चौकातील प्रकल्पामुळे नागरिकांना चांगली सुविधा झाली आहे, असे त्यांनी सांगितले. महामार्गावर महिलांसाठी स्वच्छतागृह उभारण्यात यावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
महामेट्रोतर्फे तयार करण्यात आलेल्या ‘पुणे वन कार्ड’चे लोकार्पणही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, दिलीप मोहिते पाटील, माधुरी मिसाळ, राहुल कुल, सुनिल कांबळे, संजय जगताप, सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त सौरभ राव, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम आदी उपस्थित होते.
असा आहे एकात्मिक पायाभूत सुविधा व रस्ते विकास प्रकल्प
पुणे शहरात एनडीए चौकातील राष्ट्रीय महामार्ग क्र.४८ वर सर्व मार्गिकांसहित एकूण १६.९८ किलोमीटर लांबीचा पायाभूत सुविधा व रस्ते विकास प्रकल्प उभारण्यात आला आहे. प्रकल्पाची किंमत ८६५ कोटी असून प्रकल्पामुळे परिसरात अखंड आणि वाहतूक कोंडीमुक्त रस्त्यांचे जाळे तयार झाले आहे.
पुणे-सातारा महामार्गावरील वाहतूक सहा पदरी करण्यात आली असून अंतर्गत आणि बाह्य सेवा रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. तसेच ८ वेगवेगळ्या मार्गिकांची उभारणी करण्यात आली आहे.
मुळशी-सातारा, मुळशी-मुंबई, मुळशी-पाषाण, सातारा/कोथरूड-मुळशी, पाषाण-मुंबई, पाषाण-सातारा, सातारा/कोथारूड-पाषाण आणि मुख्य रस्त्यावरून सेवा रस्त्याकडे अशा आठ मार्गिका आहेत.
एनडीए ते पाषाण ओव्हरपास आणि पाषाण ते मुंबई तसेच सातारा/कोथरूड ते मुळशी असे दोन अंडरपासही करण्यात आले आहेत.
एनडीए चौकात येणारी सर्व बाजूंची वाहतूक सिग्नलमुक्त करण्यात आली आहे. जून्या पुलाच्या ठिकाणी नवा विस्तारीत पूल उभारण्यात आला आहे. परिसराचे सुशोभिकरणही करण्यात येत आहे.
खेड आणि मंचर येथील वळण रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामाची लांबी १४.१३७ किलोमीटर असून प्रकल्पाची किंमत ४९५ कोटी आहे.
