एकात्मिक वाहतूक व्यवस्था गरजेची-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे : पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यामुळे प्रवाशांच्या संख्येत वाढ होत आहे. पुणे मेट्रोने ‘पुणे वन कार्ड’ द्वारे चांगली सुरुवात केली आहे. हे कार्ड पीएमपीएमएललाही लागू होईल अशी व्यवस्था केल्यास त्याची उपयुक्तता वाढेल. भविष्यात देशातील इतर मोठ्या शहरातही या कार्डचा उपयोग होऊ शकेल. पुण्यात एकात्मिक वाहतूक व्यवस्था निर्माण करून ५०० मीटर वर नागरिकांना विविध वाहतूक पर्याय दिल्यास ते सार्वजनिक वाहतुकीचा जास्त उपयोग करतील. आता स्मार्ट सिस्टीम तयार करण्यात येणार असल्याने बसेसची वेळ, स्थान, प्रवासी संख्याही कळू शकेल. एकात्मिक वाहतूक व्यवस्था गरजेची असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
पुणे शहरात चांदणी चौक राष्ट्रीय महामार्ग क्र.४८ वरील एकात्मिक पायाभूत सुविधा आणि रस्ते विकास प्रकल्प तसेच खेड व मंचर रस्ता चौपदरीकरणाच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते.
पुण्यात १० किलोमीटर जाण्याचा वेळ ३० ते ४० मिनिटे आहे. ही वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करावी लागेल. पुण्यातून वेगवेगळ्या शहरात जाणाऱ्या रस्त्यांमुळे शहरात वाहतूक कोंडी होते. उन्नत रस्ते तयार करून ही समस्या दूर करता येईल. केंद्रीय मंत्री श्री.गडकरी यांनी सहकार्य करण्याची तयारी दर्शविली असून यासाठी राज्य शासनही यासाठी आपला वाटा उचलेल.
चांदणी चौकातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आणि प्रकल्पाच्या आवश्यक भूसंपादनासाठी महानगरपालिकांना निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामासाठी आवश्यक भूसंपादनासाठीही निधी देण्यात आला आहे. पुण्यात पायाभूत सुविधांचा विकास झाल्यास या भागात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होईल. त्यादृष्टीने पुण्यात नवे विमानतळ होणे गरजेचे आहे. पुरंदरला विमानतळ होण्यासाठी केंद्र सरकारच्या सर्व मान्यता मिळाल्या आहेत. भूसंपादनासाठी लवकरच स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांना विश्वासात घेण्यात येईल. पुण्यातील अनेक क्लस्टरसाठी हे कार्गो वरदान ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुळा मुठा शुद्धीकरण प्रकल्पामुळे शहरातील आणि शेतीसाठी पाण्याची समस्या दूर होईल. पुण्यातील कचरा व्यवस्थापन आणि विविध विकास प्रकल्पाच्या माध्यमातून भविष्यात पुणे देशातील सुंदर आणि राहण्यायोग्य शहर होईल, असेही फडणवीस म्हणाले.
यावेळी आमदार भीमराव तापकीर यांनीही मनोगत व्यक्त केले. केंद्र आणि राज्याने प्रकल्पासाठी पुरेसा निधी दिल्याने चांदणी चौकातील रस्ते प्रकल्प पूर्ण होऊन वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत झाली असे त्यांनी सांगितले.
