साहित्य परिषद आणि नाट्य परिषद यांनी मिळून काम करणे गरजेचे : प्रशांत दामले
पुणे : शंभर वर्षांहून अधिक काळ कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्र साहित्य परिषद आणि अखिल भारतीय नाट्य परिषद या दोन्ही संस्था एकाच दिशेने जाणाऱ्या असल्याने येणाऱ्या काळात मिळून काम करणे गरजेचे आहे, असे मत अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष आणि प्रख्यात अभिनेते प्रशांत दामले यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कै. कल्याणराव जाधव सभागृह आणि अभ्यासिकेचे उदघाटन दामले यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्य-क्ष डॉ. राजा दीक्षित उपस्थित होते. यावेळी ज्यांच्या देणगीतून हे सभागृह आणि अभ्यासिका साकारली ते दुबईस्थित उद्योजक विनोद जाधव यांची विशेष उपस्थिती होती. व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, उपाध्यक्ष राजीव बर्वे, कार्यवाह ऍड. प्रमोद आडकर उपस्थित होते.
प्रशांत दामले म्हणाले, वेगवेगळ्या विचाराच्या लोकांना सोबत घेऊन चालणे हे किती आव्हानात्मक आहे हे नाट्य परिषदेचे अध्यक्षपद सांभाळताना लक्षात येते आहे. साहित्य परिषद ११८ वर्षे सातत्याने कार्यरत आहे. त्यांचे काम लक्ष्य केंद्री असल्याने त्यांच्या मार्गदर्शनाची आम्हाला खूप गरज आहे. नाट्य परिषदेला एका उंचीवर घेऊन जाण्याचे माझे ध्येय असल्याने या प्रयत्नांत सर्वांच्या मदतीची गरज आहे.
डॉ. राजा दीक्षित म्हणाले, पैसा कमावणारे अनेक असतात देण्याची दानत असणारे फार कमी असतात. विनोद जाधव यांची दानशूरता विलक्षण आहे. साहित्य परिषद ही माझ्या सांस्कृतिक आणि मानसिक भावाविश्वाचा भाग आहे. माझ्या वडिलांनी परिषदेला वाहून घेतले होते त्यामुळे परिषद मला घरासारखीच वाटते. साहित्य परिषद हे महाराष्ट्रातील साहित्य प्रबोधनाचे फलित आहे. साहित्य परिषदेने अनेकांचे सांस्कृतिक जीवन संपन्न केले आहे.
विनोद जाधव म्हणाले, साहित्य हा व्यवहारातील भाषेचा दागिना असतो. व्यवहारात मराठी राहिली तर साहित्यात ही भाषा नक्कीच राहिल. माझ्या वडिलांनी १५ वर्षे मराठी मासिक चालवले. वडिलांच्या स्मृतीनिमित्त आणि मराठी भाषा व्यवहारात राहावी या भावनेने या सभागृह आणि अभ्यासिकेला देणगी दिली आहे
यावेळी प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, नाट्य परिषद आणि साहित्य परिषद यांनी खरोखरीच एकत्र येऊन काम करायला हवे. साहित्य संस्थांनीही कालानुरूप बदलणे गरजेचे आहे साहित्य परिषदेची वास्तू दिमाखदार आणि आधुनिक सुखसोयींनी युक्त व्हावी असे साहित्यिकांचे आणि साहित्य रसिकांचे अनके दशकांचे स्वप्न होते. साहित्यप्रेमी देणगीदारांच्या सहकार्याने कार्यकारी मंडळाला ते पूर्ण करता आले याचे समाधान आणि आनंद आहे. यापुढे दुर्मिळ ग्रंथांचे डिजीटायझेशन, ग्रंथालयाचे संपूर्ण संगणकीकरण आणि अँपद्वारे त्याची माहिती वाचकांपर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.
सूत्रसंचालन वि. दा. पिंगळे यांनी केले. प्रास्ताविक सुनीताराजे पवार यांनी केले. प्रशांत दामले, विनोद जाधव, त्यांच्या पत्नी सुवर्णा जाधव, बंधू विशाल जाधव, रचनाकार अमृता बर्वे, राजन मुठाणे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. ऍड. प्रमोद आडकर यांनी आभार मानले.
प्रशांत दामले यांच्या भाषणाला सर्वांची दाद
नेहमीच्या खुमासदार आणि खुसखुशीत शैलीत प्रशांत दामले यांनी आपले भाषण केले. आपल्या घरातील बायकोला वाचता येणं ही सर्वात मोठी कादंबरी वाचण्यासारखे आहे असे प्रशांत दामले यांनी सांगताच सभागृहात एकच हशा उसळला. ते म्हणाले, आपल्याला जमिनीवर आणायचे काम करते ती बायको. त्यामुळे आपण कितीही वर गेलो तरी तिच आपल्याला जागेवर आणते. त्यामुळे नाटक फक्त बाहेरच करावं लागतं असे नाही तर घरातही करावं लागतं असे त्यांनी सांगितल्यावर सगळेच खळखळून हसले.
