Saturday, May 23, 2026
Latest NewsPUNE

रंगांशिवाय मानवी जीवनाची कल्पनाही करता येत नाही: ज्येष्ठ अभिनेते अशोक कुलकर्णी यांचे उद्गार 

पुणे  : देशातील विविध राज्यांतील हरहुन्नरी कलाकारांनी विविध माध्यमांतून केलेली रंगांची उधळण, हे कलास्पंदन कला प्रदर्शनाचे वेगळेपण आहे. रंगांशिवाय मानवी जीवनाची कल्पनाही करता येऊ नये, या वचनाची यथार्थता प्रदर्शनातील कलाकृती पाहताना येते, असे उद्गार प्रसिद्ध मराठी अभिनेते अशोक कुलकर्णी (‘श्री स्वामी समर्थ’ मालिका फेम) यांनी शुक्रवारी येथे काढले.
‘कला स्पंदन आर्ट फेअर’ या कला प्रदर्शनाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कलास्पंदन प्रदर्शनाची चौथी आवृत्ती पुण्यात २४ मे पर्यंत, म्हात्रे पुलाजवळ,  डी.पी. रस्त्यावरील सिद्धी बँक्वेट हॉल येथे आयोजित करण्यात आली आहे. दुपारी १२ ते रात्री ९ या वेळेत हे कला प्रदर्शन रसिकांसाठी विनामूल्य खुले आहे. या प्रसंगी प्रख्यात वास्तुविशारद संजीव जोशी, नामवंत कलाकार गौतम मुखर्जी, रामजी शर्मा तसेच प्रदर्शनाचे आयोजक सुदीप चक्रवर्ती उपस्थित होते.

अशोक कुलकर्णी म्हणाले, “या कलाप्रदर्शनाचे उद्घाटन करताना वेगळी भावना मनात असते. या उपक्रमाशी, कलाकारांशी एक जिव्हाळ्याचे, आपुलकीचे नाते आहे. यावर्षीच्या प्रदर्शनात रसिकांना रंगांची मुक्त उधळण असलेल्या चित्रकृतींचा आस्वाद घेता येणार आहे. मी दृकश्राव्य माध्यमात काम करणारा कलाकार आहे आणि आम्ही इतरांनी लिहिलेली संहिता सादर करतो. चित्रकृती मात्र पूर्णपणे त्या त्या कलाकाराच्या प्रतिभेतून, साधनेतून, कलाविचारांतून प्रकट झालेल्या असतात.” 

संजीव जोशी म्हणाले, कलाप्रदर्शन आणि आर्ट फेअर, यांच्यातील फरक आस्वादकांनी समजून घेतला पाहिजे. कलास्पंदन प्रदर्शनाच्या निमित्ताने उभरत्या कलाकारांना कलाविष्काराचे उत्तम व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.

रामजी शर्मा म्हणाले, प्रदर्शनातील प्रत्येक कलाकृतीद्वारा कलाकारांनी आनंद देण्याचा प्रयत्न केला आहे. कलेच्या क्षेत्रात शार्टकट नसतो, त्यामुळे युवा कलाकारांनी संयम आणि धीर, आत्मसात करावा.

प्रदर्शनाचे आयोजक सुदीप चक्रवर्ती म्हणाले, “या तीन दिवसीय कला प्रदर्शनात, १५० हून अधिक कलाकारांनी सादर केलेल्या शेकडो कलाकृतींचा संग्रह पाहता येईल. या कलाकृतींमध्ये पारंपरिक आणि लोककला श्रेणीतील मधुबनी, ओडिशा पट्टचित्र आणि मंडला कलेच्या संग्रहाचा समावेश असेल. तसेच, आधुनिक माध्यमांतील कलाकृतींचाही अनुभव घेता येईल; ज्यामध्ये मानवाकृतीप्रधान आणि अमूर्त तैलचित्रांपासून ते अत्याधुनिक डिजिटल कला आणि छायाचित्रणापर्यंतच्या विविध प्रकारांचा समावेश आहे. रेझिन आर्ट, सिरॅमिक शिल्पे, मोझॅक काम आणि डिझायनर ग्लास पेंटिंगचा समावेश असेल. प्रदर्शनाच्या तिन्ही दिवशी प्रतिभावान कलाकारांतर्फे थेट चित्रनिर्मितीचे प्रात्यक्षिक सादर केले जाईल.

उद्घाटनप्रसंगी ज्येष्ठ कलाकार गौतम मुखर्जी, मनोज दास तसेच प्रफुल्ल अहिरे उपस्थित होते. रथीन दत्ता यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading