कोळसा खाण घोटाळा : ‘लोकमत’च्या दर्डा पिता-पुत्रांना चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा
नवी दिल्ली : छत्तीसगडमध्ये कोळसा खाण वाटपात अनियमितता (Coal Mining Scam) केल्याप्रकरणी ‘लोकमत’ वर्ततपत्र समूहाचे अध्यक्ष व माजी खासदार विजय दर्डा (Vijay Darda) आणि त्यांचा मुलगा लोकमत’ वर्ततपत्र समूहाचे संचालक देवेंद्र दर्डा (Devendra Darda) यांना चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दिल्ली न्यायालयाने बुधवारी ही शिक्षा सुनावली. जेएलडी यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक मनोज कुमार जयस्वाल यांनाही चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच माजी कोळसा सचिव एचसी गुप्ता आणि इतर दोन अधिकारी केएस क्रोफा आणि के सी समरिया यांना तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे.
तुरूगवासाच्या शिक्षेसोबतच कोर्टाने M/s JLD यवतमाळ यांना ५० हजारांचा दंडही ठोठावला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला, विशेष न्यायाधीश संजय बन्सल यांनी त्यांना भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 120B (गुन्हेगारी कट) आणि 420 (फसवणूक आणि अप्रामाणिकपणे मालमत्तेचे वितरण) आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत दर्डा पिता-पुत्रांना दोषी ठरवले. 2012 मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सरकारला हादरवून सोडणाऱ्या कोळसा वाटप घोटाळ्यात 13व्या प्रकरणात या सहा जणांना दोषी ठरवण्यात आल्याचे केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने सांगितले. शिक्षेच्या प्रमाणावरील युक्तिवादादरम्यान, सीबीआयने जास्तीत जास्त शिक्षेची मागणी केली होती. दरम्यान, कोळसा घोटाळ्याच्या प्रकरणांच्या तपासावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्याबद्दल सीबीआयचे माजी संचालक रणजित सिन्हा यांच्यावरील प्रथमदर्शनी आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने एसआयटीची स्थापना केली होती.
