Sunday, October 18, 2026
Latest NewsPUNE

कारगिल विजय दिनी दिव्यांग सैनिकाला २०० विद्यार्थ्यांचा सलाम

पुणे : देशसेवा ही केवळ सैन्यदलात येऊन करता येते असे नाही. तर, आपण ज्या क्षेत्रात असू त्याक्षेत्रात सक्षमपणे कार्य करीत देशसेवा करु शकतो. त्याकरिता मानसिक दृष्टया आपण प्रत्येकाने सक्षम असायला हवे, असे सांगत कारगिल युद्धातील त्याग व शौर्यगाथा तेथे प्रत्यक्ष सहभागी सैनिक नाईक रमेश पुरी यांनी विद्यार्थ्यांसमोर उलगडली. युद्धात अपंगत्व पत्करुन आजपर्यंत परिस्थितीशी लढा देणा-या रमेश पुरी यांच्या कार्याला २०० विद्यार्थ्यांनी सलाम केला.

सैनिक मित्र परिवार, शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या मा.स.गोळवलकर गुरुजी विद्यालयातर्फे कारगिल विजय दिनाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त प्रशालेतील गणेश सभागृहात कारगिल योद्ध्यांचा विशेष सन्मान व कारगिल रणसंग्रामाचा पोवाडा सादरीकरण या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ब्रिगेडियर प्रसाद जोशी (निवृत्त), कर्नल पराग कुलकर्णी यांचे वीरपिता बंडोपंत कुलकर्णी, संस्थेचे शाला समिती अध्यक्ष मिलिंद कांबळे, आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे, शाळेच्या मुख्याध्यापिका वासंती बनकर, आनंद सराफ आदी उपस्थित होते. तिरंगी उपरणे, फुलांची परडी, श्रीफळ, श्री गणेशाची प्रतिमा देऊन रमेश पुरी यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे व सहका-यांनी कारगिल रणसंग्रामाचा पोवाडा सादर करुन केली. त्यामध्ये कारगिल युद्धाची तयारी, प्रत्यक्ष परिस्थिती आणि प्रतिकुल परिस्थितीत झालेले युद्ध पोवाडयाद्वारे विद्यार्थ्यांसमोर उलगडण्यात आले. सभागृहात विद्यार्थ्यांनी जय हिंद, भारत माता की जय, वंदे मातरम् चा एकच जयघोष केला. तर, प्रशालेतील विद्यार्थीनींनी रमेश पुरी यांना औक्षण केले.
रमेश पुरी म्हणाले, मी मूळचा उत्तराखंड येथील असून गेली १९ वर्षे महाराष्ट्रात रहात आहे. महाराष्ट्राने माझी सर्वतोपरी काळजी घेतली आहे. सन १९९१ मध्ये मी सैन्यदलात भरती झालो. सलग ८-९ वर्षे काश्मिर परिसरात काम केले. त्यानंतर १९९९ मध्ये द्रास सेक्टरमध्ये कारगिल युद्धावेळी मी होतो. तेव्हा भारतीय सैनिकांनी पराक्रमाने शत्रूचा नाश केला. त्यामध्ये अनेक सैनिक जखमी झाले, तर अनेकांनी प्राणांची आहुती देखील दिली. याची आठवण आपण ठेवायला हवी, असेही त्यांनी सांगितले. आनंद सराफ यांनी प्रास्ताविक केले. अरुणकुमार बाभुळगावकर, होनराज मावळे, ओंकार चिकणे यांनी आयोजनात सहभाग घेतला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading