Sunday, June 21, 2026
Latest NewsPUNE

मनुष्यबळ व्यवस्थापकांच्या ‘नॅटकॉन २०२३’ राष्ट्रीय परिषदेचे सप्टेंबर मध्ये पुण्यात आयोजन

पुणे  : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल मॅनेजमेंट या मनुष्यबळ व्यवस्थापकांच्या राष्ट्रीय स्तरावरील संघटनेतर्फे आयोजित केली जाणारी ‘नॅटकॉन २०२३’ ही राष्ट्रीय शिखर परिषद यंदा पुणे शहरात आयोजित करण्यात येणार आहे.या संबंधीची अधिकृत घोषणा ‘नॅटकॉन २०२३’ च्या किक ऑफ सभेत काल पुण्यात करण्यात आली.एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.आर.एम.चिटणीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली. तसेच त्यांच्या हस्ते या राष्ट्रीय परिषदेच्या http://www.natcon2023.com या संकेतस्थळाचे व माहितीपत्रकाचे अनावरण करण्यात आले.
यावेळी आपल्या प्रास्ताविकपर मनोगत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंट चे राष्ट्रीय अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी यांनी सांगितले की, ही वार्षिक राष्ट्रीय परिषद यंदा या एशिया पॅसिफिक फेडरेशन ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट (एपीएफआरएम)च्या विशेष सहकार्याने आयोजित करण्यात आली आहे. दिनांक 8 व 9 सप्टेंबर 2023 रोजी पुण्यातील हॉटेल जे. डब्ल्यू मॅरिएट येथे आयोजित करण्यात या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेत औद्योगिक क्षेत्रातील २५ हुन अधिक नामवंत तज्ञ वरिष्ठ मनुष्यबळ व्यवस्थापकांची मार्गदर्शनपर व्याख्यान सत्र आयोजित करण्यात आली आहेत. या परिषदेसाठी देशभरातून व विदेशातून सुमारे एक हजारहुन अधिक विविध नामांकित तसेच बहुराष्ट्रीय औद्योगिक कंपन्यांचे मनुष्यबळ व्यवस्थापक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
याप्रसंगी एनआयपीएम पुणे विभागाचे अध्यक्ष कल्याण पवार यांनी ही दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधत मोठ्या संख्येने सर्वांनी या राष्ट्रीय परिषदेत सहभाग नोंदवावा असे आवाहन केले.
यावेळी बोलताना या राष्ट्रीय परिषदेचे मुख्य समन्वयक डॉ. संतोष भावे यांनी आपल्या मनोगतात या नॅटकॉन या परिषदेविषयीचे सविस्तर सादरीकरण केले. तसेच मनुष्यबळ उत्कृष्टतेसाठी वाढ, लवचिकता आणि चपळता (Fostering,Resilience & Agility Towards HR Excellence ) अशी यंदाच्या राष्ट्रीय शिखर परिषदेची मुख्य मध्यवर्ती संकल्पना असून याच मध्यवर्ती संकल्पनेला अनुसरून सात उप शीर्षकाखाली दोन दिवसातील व्याख्यान सत्रे आयोजित करण्यात आली आहेत असे सांगितले.
तर कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.आर.एम.चिटणीस यांनी आपल्या मनोगतात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण सादरीकरणाद्वारे नॅटकॉन परिषदेचे महत्व विशद केले.
या परिषदेत सहभागी झाल्यामुळे मनुष्यबळ व्यवस्थापकांना आपापल्या क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींकडून त्यांचे थेट अनुभवी मार्गदर्शन उपलब्ध होणार असल्याचे सांगितले. उद्योग क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्या व व्यवस्थापनशास्त्र शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थी व अध्यापक वर्गासाठी ज्ञानार्जनाची उत्तम संधी या परिषदेमुळे उपलब्ध झाली आहे. एनआयपीएम संस्थेने विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यनगरीमध्ये ही परिषद आयोजित करण्याचा निर्णय घेतल्याबद्दलही डॉ. चिटणीस यांनी आनंद व्यक्त केला.
यावेळी कार्यक्रमाला नॅटकॉन परिषदेच्या नियोजन समितीचे अध्यक्ष सदाशिव पाटील, एनआयपीएम पुणे विभागाच्या सचिव अमृता तेंडुलकर यांच्यासह पुणे विभागाच्या कार्यकारी समितीतील सदस्य व पुणे, पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरातील विविध नामांकित कंपन्यांचे दोनशेहून अधिक मनुष्यबळ व्यवस्थापक पदाधिकारी उपस्थित होते. सामूहिक राष्ट्रगीत गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली. काय्रक्रमाचे सूत्रसंचालन वाहिदा पठाण यांनी तर आभार प्रदर्शन सदाशिव पाटील यांनी केले.
एनआयपीएम विषयी : एनआयपीएम ही मनुष्यबळ व्यवस्थापकांचे प्रतिनिधित्व करणारी राष्ट्रीय स्तरावरील संस्था असून कोलकाता येथे मुख्यालय असलेल्या या संस्थेचे संपूर्ण देशभरात ५४ ठिकाणी विभागीय कार्यालये आहेत. तसेच ४० हजार हुन अधिक सदस्य असलेल्या एनआयपीएम तर्फे सातत्याने विविध औद्योगिक कंपन्यांमधील मनुष्यबळ व्यवस्थापकांसाठी अनेक विषयांवर कार्यशाळा घेतल्या जातात.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading