Wednesday, September 2, 2026
Latest NewsPUNE

ग्रामीण भागातील शाळांमध्ये होणार विज्ञानाचा प्रसार

पुणे  : प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड (प्राज) आणि मराठी विज्ञान परिषद (मविप) यांनी महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील शाळांमध्ये विज्ञानाचा प्रसार करण्यासाठी “शनिवारी विज्ञानवारी” या उपक्रमासाठी नुकताच सामंजस्य करार केला आहे.  या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना विज्ञानाची आवड जोपासण्यासाठी प्रायोगिक शिक्षणाचा अनुभव देणे हा आहे. या सामंजस्य कराराचा एक भाग म्हणून, प्राज पुढील तीन वर्षांच्या कालावधीसाठी या उपक्रमाला आर्थिक मदत करेल.

ग्रामीण भागातील बहुसंख्य  शाळांमध्ये तसेच अगदी शहरी भागातील महानगरपालिकेच्या शाळांमध्ये सुद्धा पुरेशा प्रयोगशाळा, पायाभूत सुविधा नाहीत. परिणामी, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोग करण्याची पुरेशी संधीच मिळत नाही, प्रात्यक्षिके हा विज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी सर्वात आवश्यक घटक आहे.  या उणीवा दूर करण्याच्या उद्देशाने “ शनिवारी विज्ञानवारी” हा उपक्रम सुरू करण्यात आला, त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थी विज्ञान शाखेकडे आणि तदनुषंगिक नोकरी, व्यवसायाकडे वळू शकतील. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, मराठी विज्ञान परिषद  आपल्या  शाखांद्वारे काही शाळांची निवड करते आणि यापैकी प्रत्येक शाळा ६ वी आणि ७ वी च्या सुमारे ४० विद्यार्थ्यांची तुकडी निवडते. शनिवारी, विज्ञान शाखेतील प्रशिक्षित पदवीपूर्व विद्यार्थी, शालेय मुलांसह परस्पर सहभागात्मक पद्धतीने, योग्य स्पष्टीकरणासह विज्ञान प्रयोग करतात. परिणामी, शालेय विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या मूलभूत गोष्टी आणि दैनंदिन जीवनातील त्याच्या उपयोगाबद्दल अधिक चांगल्या प्रकारे  माहिती मिळते . त्यामुळे कृतिशील शिक्षण हा या उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे.

या वेळी मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष डॉ जे. बी जोशी म्हणाले, ” शनिवारी विज्ञानवारी या उपक्रमाला पाठिंबा दिल्याबद्दल आम्ही प्राजचे आभारी आहोत. याद्वारे आम्ही हा उपक्रम महाराष्ट्रातील आणखी २०० शाळांमध्ये पोहोचवू शकू. आमच्या संस्थेने शालेय स्तरावर चालवलेल्या अतिशय यशस्वी उपक्रमांपैकी हा एक आहे. या कार्यक्रमाला केवळ विद्यार्थ्यांकडूनच नव्हे तर त्यांच्या पालकांकडूनही मोठ्या प्रमाणावर  पसंती मिळत आहे आणि विज्ञान विषयात त्यांना  अधिकाधिक स्वारस्य निर्माण  होऊ लागले आहे.”

यावेळी बोलताना प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक अध्यक्ष डॉ.प्रमोद चौधरी म्हणाले, ” शिक्षणामध्ये विज्ञान विषयास पुढे नेण्यासाठी मराठी विज्ञान परिषद गेल्या सहा दशकांपासून प्रशंसनीय कार्य करत आहे. लहान वयातच विज्ञानाविषयी जिज्ञासा जागृत करणार्‍या या उपक्रमात मराठी विज्ञान परिषदे सोबत सहभागी होताना आम्हाला खूप अभिमान वाटतो.आमचा ठाम विश्वास आहे की प्रायोगिक शिक्षण हा विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. हा उपक्रम, शाश्वत विकासासाठी मूलभूत विज्ञानातील संशोधन वाढले पाहिजे या आमच्या  धारणेशी  सुसंगत आहे.

यात उल्लेखनीय बाब अशी आहे की डॉ. अनिल काकोडकर यांच्यासारख्या प्रख्यात शास्त्रज्ञांनी या अनोख्या उपक्रमाचा पुरस्कार केला आहे. ज्यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी विज्ञान प्रयोगांचा वापर करून शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची आणि शिक्षणाची सोय करतात.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading