Monday, May 25, 2026
Latest NewsPUNE

शिवशंकरांच्या पुष्पप्रतिकृतीमध्ये मंडईतील म्हसोबाराया विराजमान 

अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टचा म्हसोबा उत्सव ; धार्मिक कार्यक्रमांनी प्रारंभ

पुणे : मंडईतील म्हसोबा मंदिरात विविधरंगी फुलांनी साकारलेल्या २५ फूट उंचीच्या शिवशंकरांच्या आकर्षक पुष्पसजावटीमध्ये म्हसोबाराया विराजमान झाले आहेत. प्रारंभी श्रीं चा रुद्राभिषेक व होमहवन, महाआरती आदी धार्मिक कार्यक्रमांनी उत्सवाला थाटात प्रारंभ झाला. मंडई म्हसोबा मंदिराच्या परिसरात पुष्पसजावटीसोबतच विविधरंगी विद्युतरोषणाई देखील करण्यात आली असून विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

शुक्रवार पेठेतील अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टचा म्हसोबा उत्सव महात्मा फुले मंडई, बुरुड आळी येथे आयोजित करण्यात आला आहे. उत्सवाच्या पहिल्या दिवशी सकाळी पुरंदरमधील श्री क्षेत्र वीर श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थानचे विश्वस्त सचिव अभिजीत धुमाळ व प्रतिभा धुमाळ  यांच्या श्रीं चा रुद्राभिषेक व होमहवन पार पडले. तर, दुपारी भिंताडे उद्योग समूहाच्या शालन भिंताडे, पृथ्वीराज भिंताडे यांच्या हस्ते श्रीं ची महाआरती झाला. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सरपाले फ्लॉवर्सचे सुभाष सरपाले यांनी पुष्पसजावट केली. दीपक जोशी गुरुजी यांसह ६ ब्रह्मवृंदांनी पौरोहित्य केले.
मंदिर परिसरात साकारण्यात आलेल्या २५ फूट उंचीच्या भगवान शिवशंकरांच्या पुष्पप्रतिकृतीसोबतच अग्रभागी २ नंदी आणि २ त्रिशुळाच्या पुष्पप्रतिकृती देखील साकारण्यात आल्या आहेत. याकरिता सुमारे ६० बंडल पर्पल आॅर्किड, ८० किलो शेवंती, ६० किलो झेंडू, १०० बंडल गुलाब यांसह अनेक फुले वापरण्यात आली आहेत. सुभाष सरपाले यांच्या मार्गदर्शनाखाली १५ कारागिरांनी ३ दिवस व १ रात्र या कालावधीत ही आरास साकारली आहे.
धार्मिक उत्सवासोबतच विधायक उपक्रम हे उत्सवाचे वैशिष्टय असणार आहे. त्यामध्ये तृतीयपंथीयांना आर्थिक मदत, गरजू विद्यार्थ्यांना फुलस्केप वह्या प्रदान करण्याचा उपक्रम, विद्यार्थ्यांना वैद्यकीय मदत देण्याचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला आहे. तसेच, दीप अमावस्येनिमित्त दीप पूजन व दीपोत्सव करुन आगळ्यावेगळ्या पद्धतीने होणार आहे. अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट पुणे या ट्रस्टच्या फेसबुक पेजवरुन हा उत्सव भाविकांना पाहता येणार असल्याचे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading