Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी वेगमर्यादा, नशामुक्त, प्रशिक्षित-सक्षम चालक, नियम पालन या त्रिसूत्रीचा अंमल गरजेचा

पुणे : समृद्धी महामार्गावर गेल्या आठवड्यात झालेल्या अपघातामुळे संपूर्ण देशभरात खासगी प्रवासी वाहतूक सेवेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अशा प्रकारचे दुर्दैवी अपघात टाळण्यासाठी वेगमर्यादा, नशामुक्त व तंदुरुस्त चालक, नियमांचे काटेकोर पालन या त्रिसूत्रीची काटेकोर अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. सर्व खासगी बस मालकांकडून यासंदर्भात प्रतिबंधात्मक काळजी व उपयोयोजनांचा दहा कलमी कार्यक्रम राबविण्याचा निर्धार करण्यात आला आहे. प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी देण्यासाठी, तसेच विश्वासार्हता वाढविण्यासाठी नेटाने प्रयत्न करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. राज्यभरातून दोनशेच्या वर बस मालक यामध्ये सहभागी झाले होते.

समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर अपघात टाळण्यासाठी, तसेच प्रादेशिक वाहन विभागाकडून केल्या जाणाऱ्या कारवाईबाबत चर्चा करण्यासाठी पुणे बस अँड कार ओनर्स असोसिएशन, बस अँड कार ओनर्स कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया (बीओसीआय) आणि पुणे डिस्ट्रिक्ट लक्झरी बस असोसिएशन या खासगी बस मालक संघटनांच्या वतीने चर्चासत्राचे आयोजन केले होते. मित्र मंडळ सभागृहात झालेल्या या चर्चासत्रात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर, उद्योजक व ‘बीओसीआय’चे अध्यक्ष प्रसन्न पटवर्धन, पुणे बस अँड कार ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष राजन जुनवणे, किरण देसाई, पुणे डिस्ट्रिक्ट लक्झरी बस असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब खेडेकर, प्रकाश गवळी बाळासाहेब बोराटे आदी उपस्थित होते.
संजीव भोर म्हणाले, “बस मालकांच्या थोड्याशा दुर्लक्षामुळे असे गंभीर अपघात घडतात. त्यामुळे चालकाला योग्य प्रशिक्षण देण्यासह त्याची आरोग्य तपासणी व्हायला हवी. अंमली पदार्थांची नशा करून गाडी चालवणार नाही, याची दक्षता घ्यायला हवी. वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, वेगमर्यादेचे उल्लंघन करणे टाळायला हवे. आपत्कालीन दारामध्ये तडजोड करून प्रवासी भरण्याचे प्रकार थांबायला हवेत. समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातानंतर राज्यभरात वाहन तपासणी व कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. नियम मोडणाऱ्या चालकावर व त्याच्या गाडी मालकावर कठोर व दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. वेळप्रसंगी वाहन परवाना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. मद्यप्राशन करून वाहन चालवताना आढळ्यास दुसरा चालक उपलब्ध होईपर्यंत गाडी सोडण्यात येणार नाही. यासंदर्भात प्रादेशिक परिवहन विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.”
प्रसन्न पटवर्धन म्हणाले, “देशातील सर्वाधिक प्रवासी वाहतूक सेवा देणारे आपले क्षेत्र आहे. मात्र, काही अनावश्यक गोष्टींमुळे आपल्यावरील प्रवाशांचा विश्वास कमी होत आहे. ही विश्वासार्हता टिकवायची असेल, प्रतिमा सुधारायची असेल, तर आपल्याला चांगली व नियमांना धरून सेवा दिली पाहिजे. खासगी बस वाहतूक सेवेकडून लोकांना अनेक अपेक्षा आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी आपण सुरक्षेच्या बाबतीत तडजोड करता कामा नये. सरकार त्यांच्या पातळीवर ज्या उपाययोजना करायच्या ते करेल, आपण व्यावसायिक म्हणून छोट्या-छोट्या फायद्यांसाठी सुरक्षेत तडजोड करू नये.”
“व्यावसायिक म्हणून आपण चालक नशा करता नाही, हे तपासण्यासाठी ब्रेथ अॅनालायझरचा वापर करावा. वेगमर्यादा मोजणारी यंत्रणा कार्यान्वित ठेवावी. आपत्कालीन मार्गात छेडछाड करू नये. चालकाला योग्य आराम मिळण्यावर भर द्यावा. चालकांची वैद्यकीय तपासणी, त्यांची तंदुरुस्ती याकडे लक्ष द्यावे. सुरक्षेची जागृती करणारे व्हिडीओ व ऑडिओ चालकासह प्रवाशांना दाखवावेत. गाडीचे सर्व कागदपत्रे व तंदुरुस्ती यावर लक्ष द्यावे. पिकअप पॉईंटवर शिस्त पाळावी. परमिट योग्यरित्या असावे. नियमित कर भरण्यासह तिकिटांमध्ये एकवाक्यता असायला हवी,” असा दहा कलमी कार्यक्रम राबविण्याची सूचना पटवर्धन यांनी केली. त्याला सर्व उपस्थित बस मालकांनी सहमती दर्शविली.
राजन जुनवणे म्हणाले, “चालकांच्या चुकीमुळे मालकांना मोठा भुर्दंड व त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे चालकांना प्रशिक्षण देण्याची, नियमांचे पालन करण्याची सक्ती गरजेची आहे. समृद्धी महामार्गावरील अपघातानंतर कारवाईची मोहीम सुरु झाली आहे. नियमबाह्य वागणाऱ्या बस मालकांना याचा त्रास होईल. त्यामुळे संघटना म्हणून सर्वांना आवाहन आहे की, सुरक्षित व गुणवत्तापूर्ण वाहतुकीसाठी जे नियम घालून दिले आहेत, त्याचे काटेकोरपणे पालन करावे.”
किरण देसाई यांनी बस चालकांची संपूर्ण माहिती एका पोर्टल किंवा अप्लिकेशनवर आणावी, तसेच त्यांचे रेटिंग करावे अशी सूचना केली. त्यासंदर्भात पुढाकार घेऊन लवकरच ही सुविधा उपलब्ध करण्याचेही आश्वासन त्यांनी दिले. बाळासाहेब खेडेकर, बोराटे, गवळी यांनीही मनोगते व्यक्त केली. अनेक बस मालकांनी आपल्या शंका व सूचना मांडल्या. संजीव भोर व प्रसन्न पटवर्धन यांनी त्यांच्या शंकाचे निरसन केले.
—————–
प्रादेशिक परिवहन विभागाच्या सूचना
– अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत असावी
– स्पीड गव्हर्नर कार्यान्वित असावा
– लाईट्स व इंडिकेटर व्यवस्थित चालू असाव्यात
– रात्रीच्या वेळी बॅक लाईट चालू असावी
– चालक गणवेशावर असावा
– परावर्तक, हॉर्न असावा
– आसन, प्रवासी क्षमता नियमाप्रमाणे असावी
– चालकाच्या केबिनमध्ये प्रवासी बसवू नयेत
– आपत्कालीन दरवाजा सुस्थितीत असावा, तडजोड नको
– प्रवासाआधी प्रवाशांना वाहतूक सुरक्षेची माहिती द्यावी
– चालकांची आरोग्य व नेत्रतपासणी नियमित करावी
– मद्यप्राशन करून, मोबाईलवर बोलत वाहन चालवू नये

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading