Monday, May 25, 2026
Latest NewsSports

एलके इलेव्हन संघाची विजयाची हॅट्रीक; ब्राईट इलेव्हन संघाने गुणांचे खाते उघडले !!

पुणे :  एजीएएस मॅनेजमेंट तर्फे कै. अपर्णा चंद्रशेखर ओक यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित तिसर्‍या ‘मान्सुन लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धेत एलके इलेव्हन संघाने प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून विजयाची हॅट्रीक नोंदविली. ब्राईट इलेव्हन संघाने पहिला विजय मिळवत गुणांचे खाते उघडले.

मुकूंदनगर येथील कटारीया हायस्कूल मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेच्या सामन्यात कुशल असबे याच्या अचूक आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर ब्राईट इलेव्हन संघाने डेडली डायनामोज् क्लबचा ७ गडी राखून पराभव केला. अचूक गोलंदाजीच्या जोरावर ब्राईट इलेव्हनने डेडली डायनामोज् क्लबचा डाव ८३ धावांवर गुंडाळला. कुशल असबे याने १२ धावात ४ गडी टिपले. रोहन कुलकर्णी याने ५ धावात २ गडी बाद करून दुसर्‍या बाजून टिच्चून गोलंदाजी केली. ब्राईट इलेव्हन संघाने ८.४ षटकात व ३ गडी गमावून लक्ष्य सहज गाठले. कुशल असबे (नाबाद २४ धावा), मिहीर ओक (२१ धावा) आणि निलेश माळी (२० धावा) यांनी संघाला सहज विजय मिळवून दिला.

शंतनु आठवले याच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर एलके इलेव्हन संघाने फ्रेन्ड्स क्रिकेट क्लबचा ४४ धावांनी पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना एलके इलेव्हनने १४२ धावांचे आव्हान उभे केले. शंतनु आठवले (३२ धावा), नचिकेत कुलकर्णी (२७ धावा) आणि अमित गणपुले (३० धावा) यांच्या धावांच्या योगदानामुळे संघाने १४० धावांचा टप्पा पार केला. या आव्हानासमोर फ्रेन्ड्स क्रिकेट क्लबचा डाव ९८ धावांवर मर्यादित राहीला. एलके संघाच्या शंतनु आठवले (३-२१), विशाल गुप्ता (२-३७) आणि नचिकेत कुलकर्णी (२-१३) यांनी अचूक गोलंदाजी करून संघाचा विजय साकार केला.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
डेडली डायनामोज् क्लबः १८ षटकात १० गडी बाद ८३ धावा (अनिकेत कुलकर्णी १५, सम्राट देशमुख १४, कुशल असबे ४-१२, रोहन कुलकर्णी २-५) पराभूत वि. ब्राईट इलेव्हनः ८.४ षटकात ३ गडी बाद ८४ धावा (कुशल असबे नाबाद २४, मिहीर ओक २१, निलेश माळी २०, अनिकेत कुलकर्णी २-२०); सामनावीरः कुशल असबे;

एलके इलेव्हनः १८ षटकात १० गडी बाद १४२ धावा (नचिकेत कुलकर्णी २७, अमित गणपुले ३०, शंतनु आठवले ३२, स्नेहलकुमार कासार ३-२५, सचिन कापडे २-२६) वि.वि. फ्रेन्ड्स क्रिकेट क्लबः १५.३ षटकात १० गडी बाद ९८ धावा (शैलेश देशपांडे ३०, सागर वाघमारे १४, शंतनु आठवले ३-२१, विशाल गुप्ता २-३७, नचिकेत कुलकर्णी २-१३); सामनावीरः शंतनु आठवले;

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading