वंचितच्या महाविकास आघाडीतील समावेशाबद्दल प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना अल्टिमेटम
अकोला : वंचित बहुजन आघाडीच्या महाविकास आघाडीतील समावेशाबद्दल उद्धव ठाकरेंनी पुढच्या १५ दिवसांत परिस्थिती स्पष्ट करावी, असा अल्टिमेटम वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे. लवकर निर्णय झाला नाही तर आम्ही आमचे निर्णय घ्यायला मोकळे असल्याचे मोठे वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केले. ते अकोल्यात बोलत होते. वंचितच्या भारत राष्ट्र समितीसोबत संभाव्य तिस-या आघाडीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरांचे हे विधान सूचक मानले जात आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, वंचितच्या महाविकास आघाडीतील समावेशाबद्दल उद्धव ठाकरेंनी पुढच्या १५ दिवसांत परिस्थिती स्पष्ट करावी. काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी यासंदर्भात काय बोलणे झाले आहे हे स्पष्ट करावे. आता निवडणुका जवळ आल्या आहेत. उद्धव ठाकरेंनी आता न्यायालयीन लढाईच्या पुढे जात भविष्याच्या दृष्टीने निर्णय घेण्याची वेळ आली आहे. आमचा उद्धव ठाकरेंमुळे भ्रमनिरास झालेला नाही.
प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेससोबतच्या सध्याच्या बोलणीवर ‘थँक्यू’ म्हणत बोलणे टाळले. राज्यातील सध्याच्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरांनी अजित पवारांनी केलेल्या गौप्यस्फोटांवर अजित पवारांची स्तुती केली आहे. अजित पवार ‘जे ओठात, तेच पोटात असणारा नेता’असल्याची स्तुतिसुमनं आंबेडकरांनी अजित पवारांवर उधळली आहेत.
