‘दिल मलंगी’ रॉमकॉम फँटसी चित्रपटाचा शानदार मुहूर्त संपन्न!
एका विलक्षण कथा कल्पनेवरील ‘दिल मलंगी’ या अक्शन फँटसी चित्रपटाची निर्मिती ‘सदगुरु एंटरटेनमेंट’, दीपलक्ष्मी निर्मित’ संस्थेद्वारे करण्यात येत आहे. या अत्यंत आगळ्या वेगळ्या चित्रपटाचे दिग्दर्शन सुनिल परब करीत आहे. ‘दिल मलंगी’ या चित्रपटाचा मुहूर्त मुंबईत नुकताच करण्यात आला. या प्रसंगी चित्रपटातील प्रमुख कलाकार, निर्माते यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
‘दिल मलंगी’ या चित्रपटाची कथा एका तरुणाभोवती गुंफण्यात आली आहे. महाविद्यालयीन जीवनात ज्या मुलीवर मनापासून प्रेम केलं ती निव्वळ आपला टाईमपास करतेय हे लक्षात आल्यावर ‘प्रेम’ ह्या संकल्पने वरचा त्याचा विश्वास उडतो… करिअरवर लक्ष केंद्रित करण्याच्या उद्देशाने तो मुंबई गाठतो. तो एका जाहिरात एजन्सी मध्ये यशस्वी होतो. मात्र ‘मुंबई नगरी’तल्या दैंनदिन धक्काधकीच्या प्रवासाला कंटाळून या शहराचा निरोप घेण्याचे ठरवितो. ही गोष्ट त्याच्या बॉसला खटकते, ते सतेजला आणखी एक संधी देतात. ऑफिसच्या आलिशान रेस्ट हाऊसमध्ये सतेजचा मुक्काम सुरु होतो आणि त्याच्या आयुष्याचे चक्र फिरू लागते… उत्कंठा शिगेला पोहोचविणारी ही फँटसी मनोरंजनाचं अनोखं सरप्राईज असणार आहे.

मुहूर्त प्रसंगी अभिनेता चिन्मय उदगीरकर म्हणाला, ” ‘दिल मलंगी’ चित्रपटाच्या माध्यमातून जी प्रेमकथा दाखवण्यात येणार आहे ती माझ्या करिअरमधली पहिली हटके लव्हस्टोरी आहे. अशक्य वाटावी अशी ही प्रेमकथा आहे.” चित्रपटाची नायिका अभिनेत्री नक्षत्रा मेढेकर म्हणते, “मला मेकअप तसाही कमी करायला आवडतो. ‘दिल मलंगी’ या चित्रपटात माझी भूमिकाच अशी आहे की तिथं ‘नो मेकअप लूक’ हा सध्याचा ट्रेन्डिंग लूक मला कॅी करायला मिळणार आहे. जे अगदी माझ्या मनासारखं पहिल्यांदाच घडतंय.”, तर अभिनेत्री मीरा जोशी म्हणाली, ”मी पहिल्यांदाच रोमान्स करताना दिसणार आहे. यामुळे माझी पडद्यावरची इमेज नक्कीच ब्रेक होणार..”
आजच्या धकाधकीच्या जीवनात सामाजिक संदेशाची खुसखुशीत झालर असलेले हे मनोरंजन करण्यासाठी दिग्दर्शक सुनिल परब यांनी रॉम कॉम ऍक्शन फँटसीचा आधार घेतला आहे. लेखक स्वप्निल गांगूर्डे यांची कथा असून पटकथा – स्वप्निल गांगूर्डे, प्रथमेश शिवलकर तर संवाद ‘हास्यजत्रा फेम’ अभिनेता प्रथमेश शिवलकर यांनी लिहिले आहेत. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत चिन्मय उदगीरकर, आस्ताद काळे, नक्षत्रा मेढेकर, मीरा जोशी, संजीव सत्यविजय धुरी यांसह प्रमुख सहाय्यक भूमिकेत नारायण जाधव, विनम्र भाबल, प्रभाकर मोरे, भक्ती रत्नपारखी, श्रीरंग देशमुख, आमिर तडवळकर, अपूर्वा गोरे, लीना पंडित, चित्रलेखा उपासनी, रुक्मिणी सुतार, मयूर धुरी, श्रुती हळदणकर, स्वाती कर्णेकर, प्रशांत देशमुख, मानसी बापट इत्यादी कलावंत आहेत.
निर्माते रमाकांत गोविंद भोसले, दीपा रमाकांत भोसले आणि प्रमोद मुरकुटे यांच्या ‘सदगुरु एंटरटेनमेंट’, दीपलक्ष्मी निर्मित’ आणि सुनिल परब दिग्दर्शित ‘दिल मलंगी’ या चित्रपटाचा भव्य कॅनव्हास डीओपी नाना खेडकर आणि सचिन लोखंडे यांच्या नजरेतून दिसणार आहे. राहुल काळे या युवा गीतकाराने गीतरचना केली असून ‘इंडियन आयडॉल’ फेम युवा गायक आशिष कुलकर्णी यांनी संगीतकार म्हणून या चित्रपटाद्वारे पदार्पण केले आहे. गायिका आनंदी जोशी, कविता राम, आशिष कुलकर्णी इत्यादी गायकांचा सुरेल स्वर बहार आणणार असून नृत्यदिग्दर्शक संतोष भांगरे त्यावर साजेसे नृत्याविष्कार चढवणार आहेत.
