निर्माते व लेखक यांची थेट भेट घडवून आणणारी कथासंवाद कार्यशाळा संपन्न
पुणे : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ व इन्फ्नाईट व्हेरिएबल संयुक्त आयोजन केलेली कथासंवाद ही कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली.
या कार्यशाळेचे उद्घाटन ज्येष्ठ समीक्षक अशोक राणे यांनी केले. याप्रसंगी त्यांनी चित्रपट,मालिका किंवा वेब सिरीज साठी कथा कशी असावी, ती नेमकी कशी लिहावी याविषयी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेस प्रसिद्ध दिग्दर्शक,लेखक व निर्माता गजेंद्र अहिरे हे पाहुणे म्हणून उपस्थित होते. कथा प्रथम स्वतःला आवडली तरच ती निर्मात्यांना सांगणे सोपे जाते, आपल्या आजुबाजुला असलेल्या सर्वसामान्य 80%लोकांसाठी कथा लिहा तरच अश्या कथेवरील चित्रपट यशस्वी होतो असे त्यांनी सांगितले.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले या कार्यशाळे मागील भूमिका विषद करताना सांगितले की,
निर्मात्यांना चांगल्या कथा मिळाव्यात व लेखकांना चांगले निर्माते मिळावेत या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या लेखक सभासदांकडून कथा मागविण्यात आल्या होत्या. साधारण 112 कथांमधून प्राथमिक फेरीत 50 कथा निवडण्यात आल्या होत्या. त्यातून अंतिम फेरीसाठी पात्र झालेल्या 35 कथा ह्या लेखकांनी निर्मात्यांसमोर Narration/Pitching केल्या. कथा निवडीसाठी प्राथमिक फेरीचे काम राज काझी यांनी पाहिले होते. तसेच अंतिम निवड ही सुनील सुकथनकर (दिग्दर्शक), श्रीपाद ब्रम्हे , धीरज मेश्राम (दिग्दर्शक व डीन एफटीआयआय ) यांनी केली होती.
याप्रसंगी निर्माते हेमंत गुजराथी , इन्फ्नाईट व्हेरिएबल चे संचालक अभिषेक राठोड हे व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यशाळेत भाग घेण्यासाठी यवतमाळ, भंडारा, नागपूर , नांदेड, लातूर, छ.संभाजीनगर , नाशिक, मुंबई, कोकण, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पंढरपूर, जुन्नर व पुणे अश्या ठिकाणाहून 50 वर लेखक व 150 पेक्षा जास्त निर्माते सभासद उपस्थित होते.
यावेळी प्रीतम एस. पाटील यांनी सांगितलेली कथा आवडल्याने बलोच चित्रपटाचे निर्माते सचिन शिंदे यांनी या कथेवर नवीन चित्रपट निर्माण करण्याचे ठरवून हक्क विकत घेण्याचे ठरविले.
