सुझलॉनतर्फे लक्षणीय टप्पा पार, जागतिक पातळीवर २० गिगावॉट* पवन उर्जा उपकरणे कार्यान्वित करणारी पहिली भारतीय कंपनी
पुणे – सुझलॉन समूह या भारतातील सर्वात मोठ्या अक्षय उर्जा सुविधा पुरवणाऱ्या कंपनीने आज २० गिगावॉट पवन उर्जा उपकरणे बसवल्याचा लक्षणीय टप्पा गाठल्याची घोषणा केली. कंपनीच्या १२,६४७ पवनचक्क्या, सहा खंडांतील १७ देशांत बसवण्यात आल्या असून त्यामुळे जागतिक पवन उर्जा क्षेत्रात कंपनीचे स्थान अधिक बळकट झाले आहे. विशेष म्हणजे, भारतात बसवण्यात आलेल्या एकत्रित पवन उर्जा उपकरणांमध्ये सुझलॉनचा वाटा ३३ टक्के आहे. सुझलॉनच्या २० गिगावॉट पवन उर्जा उपकरणांचा परिणाम लक्षणीय आहे. कंपनीतर्फे १३ दशलक्ष भारतीय घरांना वीजपुरवठा करण्याइतपत हरित उर्जेचे उत्पादन केले जात असून दरवर्षी ५१.३५ दशलक्ष टन कार्बन उत्सर्जनाला आळा घालणे शक्य झाले आहे.
सुझलॉन समूहाचे उपाध्यक्ष गिरीश तांती म्हणाले, ’२० गिगावॉटचा लक्षणीय टप्पा पार करणे सुझलॉनची अक्षय उर्जा क्षेत्राशी असलेली बांधिलकी व कौशल्य दाखवते. भारत सरकारने तयार केलेल्या महत्त्वाकांक्षी धोरणांचे मी आभार मानतो. त्याचप्रमाणे अविरत पाठिंबा देणारे आमचे १९०० ग्राहक आणि पुरवठादारांचाही मी आभारी आहे. त्यांच्याशिवाय हे शक्य झाले नसते. ५.९ गिगावॉट भारतीय पवन उर्जा उपकरणे जगभरात बसवण्यात आली असून सुझलॉनने २० गिगावॉटचा टप्पा साध्य करत भारताला जागतिक पातळीवर महत्त्वाचे स्थान मिळवून दिले आहे.’
‘हा टप्पा पार करण्याने आगामी भविष्यात अमर्याद विकासासाठी भक्कम पाया रचला गेला आहे. हा टप्पा खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर भारताचे चिन्ह आहे, कारण भारतीय कंपनी, भारतात तयार करण्यात आलेल्या पवन चक्क्यांच्या मदतीने जागतिक मापदंड तयार करत आहे. १९९५ मध्ये २७० किलोवॉटची पहिली पवनचक्की ते २०२३ मध्ये ३ मेगावॉटची पवनचक्की असा सुझलॉनचा प्रवास भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे. संपूर्ण जगाला उर्जा स्थित्यंतर करण्यास मदत व्हावी म्हणून स्थानिक तसेच जागतिक कंपन्यांशी भागिदारी करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.’
सुझलॉन समूहाचे प्रमुख कार्यकारी अधिकारी जे पी चाल्सानी म्हणाले, ‘ग्राहकांचा आनंद, नाविन्य आणि दमदार उत्पादन तंत्रज्ञान यांवर भर दिल्याने सुझलॉनला आज हे यश मिळाले आहे. चार देशांत मिळून कंपनीची आठ आर अँड डी केंद्रे कार्यरत असून सुझलॉनने सातत्याने विश्वासार्ह उत्पादनांची श्रेणी उपलब्ध केली आहे. सुझलॉन सर्व्हिसेस ही भारतातील पहिल्या क्रमांकाची असेट सेवा कंपनी असून दीर्घकाळ टिकाणारी उत्पादने तयार करत कंपनी ग्राहकांना त्यांच्या पैशांचे पूर्ण मूल्य मिळवून देत आहे. सुझलॉनने २० गिगावॉटपर्यंत केलेला हा प्रवास श्री. तुलसी तांती यांच्या महत्त्वाकांक्षेला आलेले मूर्त स्वरूप असून त्याला ५५०० सुझलॉन कर्मचाऱ्यांचे बळ लाभलेले आहे. हरित उर्जा स्त्रोतांना आधुनिक स्वरूप देत त्यांचा वापर वाढवण्यासाठी तसेच भारताला केंद्रस्थानी ठेवत कार्बन- न्युट्रल भविष्याकडे वाटचाल करण्यासाठी सुझलॉन बांधील आहे.’
अद्ययावत तंत्रज्ञान, धोरणात्मक भागिदारी आणि शाश्वत विकास यांच्यावर लक्ष केंद्रित करत सुझलॉन भारतातील अक्षय उर्जा क्षेत्रात क्रांती घडवून आणण्यासाठी सज्ज आहे.
