वारकऱ्यांवर झालेला लाठी चार्ज क्लेशदायक – अजित पवार
पुणे : आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याच्या दरम्यान वारकरी व पोलिसांमध्ये वाद झाला तेव्हा पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज करण्यात आला. वारकऱ्यांवर लाठी चार्ज झाल्याची घटना घडल्याने विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी वारकऱ्यांच्यावर लाठी चार्ज झाल्याने सरकारला खडे बोल सुनावले. माऊलींची पालखी आळंदीहून प्रस्थान करतेवेळी वारकरी बांधवांवर झालेल्या पोलीस लाठी मारीची घटना क्लेशदायक असल्याची प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.
अजित पवार म्हणाले, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखीच्या आळंदीहून प्रस्थान सोहळ्यावेळी वारकरी बांधवांवर झालेल्या पोलीस लाठीमाराची घटना क्लेशदायक आहे. महाराष्ट्राच्या संत, भक्तीपरंपरेचं वैभव असलेल्या पंढरपूर वारीच्या इतिहासात असं यापूर्वी घडलं नव्हतं. आजची घटना मनाला दु:ख देणारी आहे. सोहळ्याचं योग्य नियोजन करुन हा प्रसंग टाळता आला असता, परंतु तसं घडलं नाही. वारकऱ्यांवरील पोलीस लाठीमाराचा आणि लाठीमार करणाऱ्या सरकारचा मी तीव्र शब्दात निषेध करतो.
