कोल्हापूर दंगलप्रकरणी ४०० जणांविरोधात गुन्हे – पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित
कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील स्थिती आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. काल शहरात झालेल्या राड्याप्रकरणी शहरातील तीन पोलिस स्टेशनमध्ये तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात ४०० आरोपी असून त्यातील ३६जणांना पोलिसांनी अटक केली आहे, सेच, आज रात्री १२ वाजेपर्यंत कोल्हापूर शहर व जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद राहील. अशी माहिती पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी आज पत्रकार परिषदेत दिली दिली.
पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितले की, काल शहरात ज्या काही दगडफेकीच्या घटना घडल्या, त्याबाबत सीसीटीव्ही तपासून आणखी काही जणांविरोधात पोलिस गुन्हे दाखल करतील व त्यांना अटक करतील. आज शहरातील बहुतांश दुकाने सुरू झाल्यावर तेथील सीसीटीव्हींचा आम्ही तपास करू. राड्याप्रकरणी अटक केलेल्या ३६ आरोपींमध्ये ३ जण अल्पवयीन मुले आहेत. त्यांना बाल न्यायालयात हजर करून पुढील कारवाई केली जाईल.
दरम्यान, कालच करवीर तालुक्यातील वरणगे पाडळी येथेदेखील एका तरुणाने औरंगजेबाच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर स्टेटस ठेवल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला. संतप्त जमावाने गावातील डवाळे गल्लीतील प्रार्थनास्थळाची तोडफोड व जाळपोळ केली. लवकरच आक्षेपार्ह स्टेटस ठेवणा-या तसेच धुडगूस घालणा-यांना अटक केली जाईल. सध्या गावात पोलिसांचा बंदोबस्त असून गावातील तणाव निवळला आहे. गावातील जनजीवन पूर्वपदावर आले आहे.
पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित म्हणाले, काल हिंदू संघटनांनी काढलेल्या मोर्चाचे पूर्ण सीसीटीव्ही फुटेज तपासले जाईल. त्यात कुणी प्रक्षोभक भाषण केले आहे का? त्यामुळे जमाव भडकून पुढे दगडफेक झाली का?, हे तपासले जाईल. पोलिस कुणाचीही गय करणार नाहीत. दंगलीला जबाबदार असणा-या सर्वांवर कारवाई केली जाईल. तसेच, कोल्हापूर शहरात आतादेखील अतिरिक्त बंदोबस्त तैनात असून नागरिकांनी घाबरण्याचे काहीही कारण नाही.
पोलिस अधीक्षकांनी सांगितले की, औरंगजेबाचे आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याप्रकरणी जे गुन्हे दाखल झाले त्यामध्ये दोन मुले अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील सर्वच आरोपी हे महाविद्यालयात जाणारे तरुण आहेत. सुरुवातीला केवळ एका तरुणाने औरंगजेबाच्या समर्थनार्थ स्टेटस ठेवले होते. त्यानंतर इतर मुलांनी ते स्टेटस कॉपी केले. या मुलांना हे स्टेटस ठेवण्यासाठी कुणी प्रवृत्त केले होते का?, याचा शोध घेतला जाईल.
